नागपुरात ‘दृश्यम स्टाईल’ हत्या; सेप्टिक टँकमध्ये लपवला मृतदेह, मोबाईलही फेकला

नागपुरात ‘दृश्यम स्टाईल’ हत्या

सेप्टिक टँकमध्ये लपवला मृतदेह, मोबाईलही फेकला

 

नागपूर : प्रेमसंबंधातून विवाहिता चिमूर येथून मुले आणि पतीला सोडून प्रियकरासोबत नागपूरला आली. मात्र, दोघांत झालेल्या वादात प्रियकराने रागात गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर दृष्यम चित्रपटाप्रमाणे तिचा मृतदेह एका निर्माणाधीन इमारतीच्या सेप्टिक टँकमध्ये लपवला. ही खळबळजनक घटना मंगळवारी बेलतरोडी पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. पोलिसांनी आरोपीला अटक करून मृतदेह ताब्यात घेतला.

अनुराधा (वय 40, रा. चिमूर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. नरेश उर्फ नरेंद्र पांडुरंग डाहुले (वय 40, रा. बेसा-घोगली) असे आरोपीचे नाव आहे. नरेश हा चंद्रपूर पोलिसात कार्यरत होता. परंतु, त्याला अवैध कामामुळे जानेवारी महिन्यात सेवेतून बडतर्फ करण्यात आले. तेव्हापासून तो घोगलीत राहत होता. अनुराधाचे पती बँकेत वरिष्ठ अधिकारी आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नरेश आणि अनुराधा एकाच शाळेत शिकत होते. दहावीनंतर दोघांचाही संपर्क तुटला. ऑगस्ट महिन्यात फेसबुकच्या माध्यमातून दोघे पुन्हा संपर्कात आले अन् प्रेमसंबंध जुळले.

दरम्यान, 26 नोव्हेंबर रोजी अनुराधा ट्रॅव्हल्स बसने नागपुरात आली आणि नरेशला भेटायला गांधीबाग परिसरात गेली. नरेश तिला कारमध्ये बसवून रेशीमबाग परिसरात घेऊन गेला.

  • मृतदेह घेऊन फिरला

भाडणादरम्यान रागात नरेशने अनुराधाच्या ओढणीनेच तिचा गळा आवळला. त्यानंतर तो कारमध्ये अनुराधाचा मृतदेह घेऊन शहरभर फिरला. अखेर त्याने मृतदेह वेळाहरी गावातील एका निर्माणाधीन इमारतीच्या सेप्टिक टँकमध्ये फेकला. अनुराधाचा मृतदेह कुजल्यानंतर सर्वांना घटनेची माहिती होईल, या भीतीने त्याने कुत्र्याचीही हत्या करून तो मृतदेह सेप्टिक टँकजवळ फेकला.

  • चंद्रपुरातून केली कार चोरी

पोलिसांनी अंदाज वर्तविला आहे की, नरेशने आधीच अनुराधाचा खून करण्याची योजना बनवली होती. त्याला संशय होता की, अनुराधा घरून पळून यायला नकार देईल. त्यामुळे त्याने चंद्रपुरातून एक कार चोरी केली. याच कारमध्ये तो अनुराधासह फिरत होता. चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) ने कार चोरीचा तपास सुरू केला होता. अखेर पोलिसांना नरेशचा सुगावा लागला.