अखेर ठरलं, या दिवशी होणार मंत्रिमंडळ विस्तार; शपथविधीचीही जय्यत तयारी
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि अनेक नाट्यमय घडामोडीनंतर महायुती सकारच्या मंत्रिमडळ विस्ताराला मुहूर्त सापडला आहे. शपथविधीचीही जय्यत तयारी सुरू आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि अनेक नाट्यमय घडामोडीनंतर महायुती सकारच्या मंत्रिमडळ विस्ताराला मुहूर्त सापडला आहे. शपथविधीचीही जय्यत तयारी सुरू आहे. मंत्रिमंडळाचा शपथविधी 15 डिसेंबरला दुपारी 4 वाजता होणार आहे. चार दिवसापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यानंतर विधानसभा अध्यक्षाची निवडही झाली. मात्र मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला नसल्याने विस्ताराला उशीर लागत होता.

दरम्यान नागपूरमध्ये दुपारी चार वाजता मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या मंत्रिमंडळात दहा वर्षांत संधी न मिळालेल्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे शिंदे भाजपमध्ये गेल्याने भविष्यात पक्ष मजबूत करण्यासाठी नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल असं म्हटलं जात आहे.
महायुतीमधील घटक पक्षाचे खातेवाटप व मंत्रीपदाचा फॉर्म्युला फायनल झाला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा शपथविधी 15 डिसेंबरला दुपारी 4 वाजता होणार आहे. राज्यात गेल्या अडीच वर्षांपासून महायुतीचं सरकार आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळात गेल्या दहा वर्षांत संधी न मिळालेल्या भाजपमधील चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आता जुन्या मंत्र्यांना हटवून नवे चेहरे आणण्याची रणनीती सुरू आहे. यातच अनेक बड्या नेत्यांचा पत्ता कट होणार असून नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे समजते. विशेषतः एकनाथ शिंदे यांनी चार बड्या नेत्यांना वगळण्याचा निर्णय घेतला असल्याचा समजतो. त्यामुळे मोठ्या संख्येने शिवसेनेत नव्या चेहऱ्याना संधी मिळण्याची शक्यता आहे.
नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा दारुण पराभव करत मोठं यश मिळवलं. 288 जागांपैकी 230 जागावर महायुतीने विजय मिळवला. मंत्रिमंडळात भाजपचे 21 मंत्री असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला १० आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 12 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय गेल्या टर्ममध्ये असलेली खाती त्यांच्याकडेच राहणार असल्याची माहिती आहे. गृहमंत्रालयावरून सुरु असलेला वाद मिटला आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत नवी दिल्लीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. यानंतर नवीन मंत्र्यांच्या शपथविधीची तारीख 15 डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत त्याआधी नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे.
- संजय राऊत यांचा अजब दावा
अजित पवारांनी शरद पवारांच्या वाढदिवासानिमित्त भेट घेतली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच शरद पवारांचे 5 खासदार फोडले तरच अजित पवारांच्या पक्षाचा 6 खासदारांसह कोटा पूर्ण होऊन त्यांना केंद्रीय मंत्रिपद मिळणार असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केला आहे. मात्र राऊतांचा हा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीने फेटाळून लावला आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने राऊतांच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे.



