कोल्डड्रिंकमधून विष देत मित्राला संपवलं ; मित्रानेच केला घात, कारण हैराण करणारं
नागपूर : पैशाचा रुबाब दाखवून सतत अपमानित करत असल्याने शीतपेयातून विष देऊन विद्यार्थ्याची हत्या करण्यात आल्याची थरारक घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निलकंठनगर येथे उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्याला अटक केली. मिथिलेश ऊर्फ मंथन राजेंद्र चकोले वय १९ रा. निळकंठनगर, असं अटकेतील मारेकऱ्याचं, तर वेदांत ऊर्फ विजय कालिदास खंडाते वय १७ रा. नीलकंठ नगर, असं मृत तरुणाचं नाव आहे
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वेदांत याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली. वेदांत आणि मिथिलेश मित्र होते. दोघेही सोबत दारू प्यायचे. वेदांत हा सर्व खर्च करायचा. तो मिथिलेशवर पैशाचा रुबाब टाकायचा. त्याला सतत अपमानित करायचा. त्यामुळे मिथिलेश हा संतापला. दरम्यान, काही दिवसापूर्वी वेदांतच्या वडिलांनी शेती विकल्याची माहिती मिथिलेश याला मिळाली. त्याने वेदांतला ठार मारून खंडणी वसूल करण्याचा कट आखला. ८ एप्रिलला हनुमान जयंतीची देणगी द्यायला जायचे असल्याचे सांगून मिथिलेशने वेदांतला भेटायला बोलावलं. त्यानंतर दोघेही मिथिलेशच्या मोटारसायकलवर बसले. शीतपेयात दारू मिसळली. एका बाटलीत मिथिलेशने दारूसह विषही टाकलं. ही बाटली त्याने वेदांत याला प्यायला दिली. दारू समजून वेदांतने विषही प्राशन केलं. काही वेळाने वेदांत घरी परतला. त्याला उलटी झाली. त्याच्या आईने विचारणा केली असता मिथिलेशसोबत शीतपेय प्यायल्याचं त्याने आईला सांगितलं.

वेदांतला सक्करदऱ्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण १२ एप्रिलला सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. हुडकेश्वर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासादरम्यान मिथिलेशने शीतपेयात दारू आणि विष मिसळून ते वेदांतला प्यायला दिल्याचं समोर आलं. पोलिसांनी मिथिलेश याला अटक केली. सतत अपमानित करत असल्याने वेदांतचा खून केल्याचे मिथिलेशने पोलीस चौकशीत मान्य केलं आहे.


