मसाज सेंटरच्या नावावर देहव्यापार : ‘डीलाईट स्पा‘मधील पाच तरुणींची सुटका ; दोन आरोपी अटकेत
नागपूर : बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रद्धानंदपेठेतील ‘डीलाईट स्पा’ मधील देहव्यापारावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घातला. या छाप्यात पाच तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. स्पा मालक आणि व्यवस्थापकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रहानुद्दीन शहाबुद्दीन (आसाम) आणि रिजूल अली इस्माईल अली (२६, गुवहा आसाम) अशी आरोपींची नावे आहेत.
दक्षिण अंबाझरी मार्गावर श्रद्धानंदपेठमध्ये ‘डिलाईट स्पा’ नावाने मसाज सेंटर सुरु होते. या मसाज सेंटरमध्ये आसाम, नागालँड, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि मणिपूर राज्यातील तरुणी मसाजची कामे करीत होत्या. मात्र, मसाजच्या आड तरुणींकडून स्पा सेंटरचा मालक रहानुद्दीन हा देहव्यापार करवून घेत होता. पाचही मुलींची राहण्याची व्यवस्था स्पामधील एका खोलीत करण्यात आली होती. त्यामुळे त्या तरुणींना ग्राहक आल्यानंतर देहव्यापारासाठी नकार देता येत नव्हता. गेल्या दोन वर्षांपासून तरुणींचे लैंगिक शोषण या मसाज सेंटरमध्ये सुरु होते. मसाज पार्लरवर दिवसेंदिवस आंबटशौकीनांची गर्दी वाढत होती. त्यामुळे शेजारी असलेल्या नागरिकांना संशय आला. यासोबतच काही पोलीस कर्मचारीसुद्धा तेथे भेटी देत होते. त्यामुळे नागरिकांनी थेट पोलीस उपायुक्तांना देहव्यापाराच्या अड्ड्याची माहिती दिली. त्यामुळे गुन्हे शाखेचा पथकाने सायंकाळी छापा घातला. या छाप्यात पाचही तरुणी अर्धनग्नावस्थेत आढळून आल्या. तसेच एका आंबटशौकीन ग्राहकाशी रिजूल अली हा सौदेबाजी करीत होता. ग्राहकासमोर तरुणी उभ्या करण्यात आल्या होत्या. पोलिसांनी रिजूलला अटक केली तर पाचही तरुणींना ताब्यात घेऊन त्यांची महिला सुधारगृहात रवानगी केली.

देहव्यापारात सहभागी असलेल्या तरुणी १८ ते २५ वयोगटातील असून त्यांना नोकरीचे आमिष दाखवून नागपुरात आणले होते. तरुणींकडून बळजबरी देहव्यापार करवून घेण्यात येत होता. डिलाईट स्पा’चा मालक आणि व्यवस्थापक प्रत्येक आंबटशौकीन ग्राहकांकडून पाच ते सात हजार रुपये घेत होता. मात्र, त्यापैकी तरुणींना केवळ १ हजार रुपये देत होता. तसेच त्यांनी देहव्यापार करण्यास नकार दिल्यास त्यांना मारहाणही करीत होता. पाचही तरुणींच्या आईवडिलांची आर्थिक स्थिती बेताची आहे. त्यामुळे तरुणी नोकरीच्या आमिषाने नागपुरात आल्या होत्या. मात्र, येथे त्यांच्याकडूब बळजबरी देहव्यापार करवून घेण्यात येत होता.

