मनसेच्या पाठपुराव्याने पचखेडी–तारोली रस्त्याच्या दुरुस्तीला सार्वजनिक बांधकाम विभागाचा हिरवा कंदील
लवकरच होणार कामाला सुरवात
कुही – तालुक्यातील पचखेडी–तारोली मार्गाची अवस्था अक्षरशः मृत्यू मार्गासारखी झाली असून, रस्त्यावरचे प्रचंड खड्डे प्रवाशांच्या जीवावर उठले आहेत. एवढेच नव्हे तर, पायदळ चालणे सुद्धा नागरिकांसाठी संकट ठरत असून रोजच्या प्रवासात शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि रुग्णांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.या रस्त्यावर एसटी बसच्या रोज तीन-चार फेर्या चालतात.
पाचवी वरील शिक्षण घेणारी मुले दररोज याच मार्गाने जातात. आरोग्य तपासणी, बँक कामकाज, शेतमाल विक्री व शेतात जाण्यासाठी हा मार्ग जीवनरेषा आहे, मात्र शासनाने मागील दहा–पंधरा वर्षांपासून संपूर्ण दुर्लक्ष केले आहे.
या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तालुका उपाध्यक्ष विजय कस्तुरे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अभियंता जिल्हा परिषद नागपूर व आमदार संजय मेश्राम यांना निवेदन देऊन तात्काळ दुरुस्तीची मागणी केली. सात दिवसांत काम सुरू झाले नाही, तर मनसे जिल्हाध्यक्ष शेखरभाऊ दुंडे यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर तीव्र आंदोलन छेडले जाईल,असा इशारा शिवपाल फेंडर, मनोज बांगळकर, राकेश दुधपचारे, नथू कडूकार, सचिन मुळे, महादेव आंबोने, संजय रामटेके, सौरभ खांबाडकर, सुधाकर खांबाडकर यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया
पचखेडी–तारोली रस्त्याच्या दुरुस्तीबाबत उपविभागीय अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. अखेर सातत्यपूर्ण मागणीला यश मिळाले असून बांधकाम विभागाने लवकरच काम सुरू करण्याची ग्वाही दिली आहे. मनसेच्या ठाम भूमिकेमुळे नागरिकांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.
–शेखरभाऊ दुंडे, जिल्हाध्यक्ष, मनसे (रामटेक व उमरेड विधानसभा)
हा रस्ता पूर्णपणे उध्वस्त झाला असून या मार्गावर शेतकरी, विद्यार्थी, महिला व रुग्ण यांची सतत वर्दळ असते. मागील महिनाभर आम्ही वारंवार पाठपुरावा करत होतो. शेवटी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्तीला हिरवा कंदील दिला. सर्व मनसे सैनिकांकडून विभागाचे आभार.
– विजय कस्तुरे, तालुका उपाध्यक्ष, मनसे कुही


