नागपुरातील युवकाचा गोव्याच्या समुद्रात बुडल्याने मृत्यू

नागपुरातील युवकाचा गोव्याच्या समुद्रात बुडल्याने मृत्यू

 

नागपूर  : गोवा येथे बहिण आणि जावयासह फिरायला गेलल्या नागपुरातील एका ३२ वर्षीय युवकाचा येथील समुद्रात बुडल्याने मृत्यू झाला. तरुण मुलाच्या मृत्युची वार्ता नागपुरात राहणाऱ्या त्याच्या आई-वडिलांना कळताच त्यांना धक्का बसला. त्याचे कुटुंबीय व नातेवाईक गोव्याकडे  निघाले असून शनिवारी त्याचे पार्थिव नागपुरात पोहचणार असल्याचे सांगितले जात आहे.

प्रणय विजय थूल (३३) रा. न्यू इंदिरा कॉलोनी, भगवाननगर असे मृतक युवकाचे नाव आहे. त्याला आई-वडील व एक विवाहित बहिण आहे. वडील हे जिल्हापरिषदेच्या देवलापार येथील मिल्ट्री स्कूलमधून सेवानिवृत्त झाले आहे. आई गृहिणी आहे. बहिण व जावई नाशिकला राहतात.

प्राप्त माहितीनुसार, प्रणय थूल हा पुणे येथे एका खासगी कंपनीत कार्यरत होता. तर विवाहित बहीण श्वेता ही नाशिकला राहते. गुरुवारी बहीण व जावई यांचे गोवा येथे फिरायला जाण्याचे ठरले. यावेळी अविवाहित भाऊ प्रणयला सोबत न्यावे, असे बहिणीला वाटले. त्यामुळे बहीण आणि जावई पुण्याला प्रणयकडे गेले आणि येथून तिघेही कारने गुरुवारी दक्षिण गोवा येथे गेले. सर्वांनी समुद्र किणाऱ्यावरील एका हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला. यावेळी प्रणय हा एका खोलीत, तर दुसऱ्या खोलीत बहीण, जावई आणि भाची असे तिघे होते. जेव्हा पहाटेच्या सुमारास बहिणीने भाऊ प्रणयच्या खोलीत जावून बघितले तर दारावर त्याची चप्पल होती. आणि आत मोबाईल ठेवलेला होता. परंतु खोलीत प्रणय आढळून आला नव्हता. अखेर समुद्र किणाऱ्यावरील तटरक्षकांनी समुद्रातून प्रणयचा मृतदेहच बाहेर काढला.

या  संशयास्पद मृत्युची गोव्यातील पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. येथील पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. पुढील तपास गोवा पोलिस करीत आहेत. प्रणयचे पार्थिव शनिवारी विमानाने नागपुरात येणार असून मानेवाडा घाटावर सकाळी ११ च्या सुमारास अंत्यसंस्कार होणार असल्याचे सांगितले जाते.

  • भावाचा मृतदेह बघून बहिणीने फोडला हंबरडा

शेवटी बहिण आणि जावयाने हॉटेलसह समुद्र तटावर प्रणयचा शोध घेतला. मात्र तो कुठेही आढळून आला नाही. त्यामुळे त्यांनी समुद्र तळावरील जीवन रक्षकांना प्रणय दिसत नसल्याचे सांगितले. त्यांनी लगेच समुद्रात त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली असता प्रणयचा मृतदेह आढळून आला. समोर भावाचा मृतदेह बघून बहिणीने एकच हंबरडा फोडला. मात्र इतक्या पहाटे प्रणय हा समुद्राच्या पाण्याकडे का व कसा गेला? असा प्रश्न निर्माण झाला आहे.