पत्नीची लेकीच्या ताब्यासाठी मागणी ; निर्दयी बापाने घरातच आठ वर्षांच्या लेकीला संपवलं

पत्नीची लेकीच्या ताब्यासाठी मागणी ; निर्दयी बापाने घरातच आठ वर्षांच्या लेकीला संपवलं

नागपूर : पत्नीशी सुरू असलेल्या कौटुंबिक वादातून एका पित्याने आपल्या आठ वर्षांच्या चिमुकल्या मुलीची चाकूने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरोदेनगर परिसरातील प्लॉट क्रमांक 12 येथे बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. शेखर शेंदरे (वय 46) असे आरोपी पित्याचे नाव असून, धनश्री शेंदरे (वय 8) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. धनश्री ही आजी कुसुमबाई आणि वडिलांसोबत राहत होती.

मिळालेल्या माहितीनुसार, शेखर शेंदरे आणि त्याची पत्नी शुभांगी यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. पत्नी शुभांगी वेगळी राहत होती आणि मुलीचा ताबा (कस्टडी) आपल्याकडे देण्याची मागणी करत होती. मात्र, शेखर याला तीव्र विरोध करत होता. याच कारणावरून दोघांमध्ये सतत वाद होत असल्याचे सांगितले जाते. आरोपी दारूच्या आहारी गेला होता आणि पत्नीवर संशय घेत मारहाण करत असल्याचेही पोलिस तपासात पुढे आले आहे. बुधवारी पहाटे आरोपी दारूच्या नशेत होता. याच दरम्यान धनश्रीने पाणी मागितले आणि आधीपासून मनात असलेल्या रागाच्या भरात शेखरने थेट चाकू उचलून मुलीच्या छातीत वार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली धनश्री मदतीसाठी रडत होती. तिच्या किंकाळ्या ऐकून आजी कुसुमबाई आणि काका उमेश घटनास्थळी धावले.

गंभीर जखमी अवस्थेत धनश्रीला मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी धनश्रीला मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. आजी कुसुमबाई शेंदरे यांच्या तक्रारीवरून वाठोडा पोलिस ठाण्यात शेखर शेंदरे याच्याविरोधात हत्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, घटनेचा सखोल तपास सुरू आहे. कौटुंबिक वादातून एका निष्पाप चिमुकलीचा बळी गेल्याने ही घटना समाजाला अंतर्मुख करणारी ठरत आहे.