कुही पोलिसांची धडक कारवाई
१४ लाख ९६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
कुही:- कबाडीच्या साहित्याखाली सुगंधित तंबाखूची वाहतूक करत विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असलेल्या ट्रकचालकावर कुही पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत सुगंधित तंबाखू सह तब्बल 14 लाख 96 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शुक्रवारी कुही पोलीस पेट्रोलिंग करत असताना खात्रीशीर बातमीदाराकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वदोडा मार्गे कुही कडे येणाऱ्या अशोक ले लँड कंपनीच्या एका ट्रक मध्ये कबाडी साहित्याच्या खाली सुगंधित तंबाखू लपवून नेत असल्याची माहिती मिळाली. लागलीच याची माहिती वरिष्ठांना देऊन पंचासमक्ष कुही शहरापासून 2 किमी अंतरावर असलेल्या कुही-वदोडा मार्गावर थांबून वाट पाहत असताना वदोडामार्गे एक एमएच 40 सिटी 0959 क्रमांकाचा ट्रक येताना दिसला. लागलीच पोलिसांनी ट्रक थांबवून ड्रायवर ची विचारपूस केली असता ट्रक ड्रायव्हरने उडवाउडवीची उत्तरे दिली. लागलीच पोलिसांनी पंचासमक्ष पाहणी केली असता ट्रकमध्ये कबाडी साहित्याच्या खाली तंबाखू वाहतूक करत असल्याचे दिसून आले.
ट्रकमध्ये एका पिवळ्या रंगाचा बोरीत 4 लहान बोरी असून प्रत्येक चारही बोरीमध्ये हिरव्या रंगाच्या एका पॅकेटमध्ये 10 होला हुक्का शिशा तंबाखूचे पॉकेट आढळून आले.एका पॉकेटमध्ये 5 लहान पॉकेट प्रत्येकी वजन 200 ग्रॅम किंमत 164 रुपये प्रमाणे असे एकूण 40 पॅकेट किंमत 32800 रुपये चा माल एका बोऱ्यामध्ये आढळून आला.अश्या एकूण 6 बोऱ्यामध्ये 1200 पॉकेट एकूण किंमत 1 लाख 96 हजार 800 रुपयांचा सुगंधित तंबाखू आढळून आला. तसेच कुही पोलिसांनी वाहतूक करत असलेला 1 लाख 96 हजार 800 रुपयाच्या सुगंधित तंबाखू व तंबाखू वाहतुकीसाठी वापरलेला ट्रक किंमत 13 लाख रुपये असा 14 लाख 96 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आला आहे. पोलिसांनी ट्रकचालक आरोपी राहुल घनश्याम रहागडाले (वय 35) रा. मोतीनगर,बालाघाट (म.प्र.) व धनराज राजाराम रहागडाले (वय 39) रा.किन्ही ,ता.खैरलांजी, जि.बालाघाट (म.प्र.) यांचेविरुद्ध बी.एन.एस.२०२३ अन्वये १२३,२२३,२७४,२७५,3(५),अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ चे कलम ५९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई कुहीचे ठाणेदार भानुदास पिदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनी मनोहर गभने, सपोउपनि चांगदेव कुथे,पो.शि.रवींद्र मारबते,पो.शि. आशिष चौधरी यांच्या पथकाने केली आहे.



