अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
घटनेमुळे परिसरात हळहळ
कुही : भरधाव अज्ञात चारचाकी वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. १४) दुपारी सुमारास नागपूर–आंभोरा मार्गावरील वेलतूर शिवारात घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कृष्णा सुधाकर धकाटे (वय ३५, रा. वेलतूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धकाटे हे आपल्या एमएच-४९/ई-६६२० क्रमांकाच्या दुचाकीने आंभोरा येथून वेलतूरकडे येत होते. दरम्यान, अज्ञात भरधाव चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले.
स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने वेलतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.घटनेची माहिती मिळताच वेलतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.







