वाघाची शिकार करून चारही पंजे, मिश्या, दात गायब: खापा वनपरिक्षेत्रातील घटना 

वाघाची शिकार करून चारही पंजे, मिश्या, दात गायब: खापा वनपरिक्षेत्रातील घटना 

नागपूर : खापा वनपरिक्षेत्राअंतर्गत नागलवाडी वनवर्तुळअंतर्गत कोरमेटा नियतक्षेत्रातील मौजा सिरोंजी हद्दीत धनगाळा नाल्यामध्ये वाघ पडून असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी वन विभागाला दिली. वनकर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेबाबत खात्री केली असताना त्याठिकाणी वाघ मृतावस्थेत असल्याचे त्यांना दिसून आले.

मृत वाघाचे वय तीन ते साडेतीन वर्षाच्या दरम्यान असल्याचे निदर्शनास आले. तसेच वाघाचे चारही पंजे, मिश्या आणि दात शिकाऱ्यानी नेल्याचे आढळून आले. घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरात पाहणी केली असता परिसरातील ११ केव्हीच्या विद्युत वाहिनीजवळ लोखंडी तार व इतर साहित्य जप्त करण्यात आले. वाघाची शिकार विद्युत वाहिनीद्वारे करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले.

वाघाचे शवविच्छेदन सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रात करण्यात आले. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यात येत असून घटनास्थळी आढळलेल्या साहित्याच्या आधारे व यापूर्वी वन्यजीव गुन्ह्यातील आरोपींच्या आधारे शिकाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे.