मोबाईल चोरीचा वादातून पान टपरीसमोर कुख्यात गुन्हेगाराचा खून

मोबाईल चोरीचा वादातून पान टपरीसमोर कुख्यात गुन्हेगाराचा खून

नागपूर : उपराजधानीत हत्येचे सत्र सुरूच असून, पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवरीनगर परिसरात कुख्यात गुन्हेगाराचा खून करण्यात आला आहे. ही घटना सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. जितेंद्र ऊर्फ जितू राजू जयदेव वय ४० रा. भीम चौक, असे मृतकाचं नाव आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकरी इतवारीदास शिवदास माणिकपुरी वय ३५ रा. नवीननगर याला अटक केली आहे. जितूविरुद्ध खुनासह अनेक गुन्हे दाखल आहेत. इतवारीदास विरोधातही घरफोडी आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

इतवारीदासचा मोबाइल चोरी गेला. जितू याने मोबाइल चोरी केल्याचा संशय त्याला आला. सोमवारी सायंकाळी इतवारीदास हा हिवरीनगरमधील पान ठेल्यावर गेला. येथे जितू उभा होता. इतवारीदास याने जितूकडे मोबाइलबाबत विचारणा केली. माझ्याकडे मोबाइल नाही, असं जितू म्हणाला. यावरुनच दोघांमध्ये वाद झाला. वादादरम्यान जितूने इतवारीदासच्या कानशिलात लगावली. यामुळे इतवारीदास संतापला. त्याने काठीने जितूच्या डोक्यावर वार केले. तिथेच घटनास्थळीच जितूचा मृत्यू झाला. जितूवर हल्ला करुन, त्याला ठार केल्यानंतर इतवारीदास घटनास्थळावरुन पसार झाला.

घटनेची माहिती मिळताच पारडी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी जितूचा मृतदेहाच पंचनामा करून हॉस्पिटलकडे रवाना केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. आरोपीचा शोध घेऊन इतवारीदास याला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पारडी पोलीस करीत आहे.