नागपुर : रेस्टॉरंट मालक अविनाश भुसारींची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्त्या
नागपूर : शहरातील प्रख्यात सोशा रेस्टॉरंटचे मालक अविनाश भुसारी यांची गोळीबार करुन हत्या करण्यात आल्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्या. रुग्णालयात नेले असता 28 वर्षीय भुसारींना मयत घोषित करण्यात आले.
अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रामनगर मार्गावरील सोशा कॅफेजवळ मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार झाला. टोळी युद्धातून ही घटना घडल्याचा संशय आहे. मात्र हत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. नागपुरातील सोशा रेस्टॉरंटचे मालक असलेल्या 28 वर्षीय अविनाश राजू भुसारी यांची हत्या करण्यात आली. भुसारी आणि निंबस कॅफेचे मॅनेजर आदित्य हे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एकत्र बसून आईसगोला खात होते. यावेळी चार आरोपी मोटरसायकल आणि पांढऱ्या रंगाच्या मोपेडवर डबल सीट बसून आले. आरोपींनी स्वतःजवळ असलेल्या पिस्तुलमधून अविनाश राजू भुसारी यांच्यावर गोळ्या झाडल्या व तिथून पळून गेले. हिरणवार टोळीने गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे.

अविनाश भुसारींना व्होकार्ड हॉस्पिटल येथे भरती केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले आहे. त्यांचे वडील राजू भुसारी यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबाझरी पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.


