सट्ट्याच्या करोडो रुपयांचे हेराफेरी प्रकरण : पुन्हा एक आरोपी अटकेत  

सट्ट्याच्या करोडो रुपयांचे हेराफेरी प्रकरण : पुन्हा एक आरोपी अटकेत  

पांढरकवडा : तालुक्यातील विविध गावातील विद्यार्थी व सुशिक्षीत बेरोजगार युवकांना रोहयोचे काम देतो म्हणुन सुमारे २७ विद्यार्थी व युवकांचे पांढरकवडा येथील महाराष्ट्र बॅकेत खाते उघडुन त्यातुन क्रीकेट सट्ट्याच्या करोडो रुपयांची हेराफेरी करण्यात आली होती. त्या प्रकरणात एलसिबीच्या पथकाने याआधी चार जणांना अटक केली होती. तर याच प्रकरणातील चंद्रपुर येथील सारंग साठवणे ३५ याला सुध्दा पोलीसांनी अटक केली.

युवकांच्या खात्यातील करोडो रुपयांच्या ट्रान्झेक्शन प्रकरणी पांढरकवडा पोलीसांनी सर्वप्रथम श्रीकांत कर्लावार याच्या फिर्यादी वरुन मयुर राजेश चव्हाण २३ रा चोपन ता. केळापुर, मनोहर राठोड ४५ रा जरंग तालुका घाटंजी यांच्या विरुध्द विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते. सदर प्रकरणाचा तपास एलसिबीकडे देण्यात आल्या नंतर एलसिबिच्या पथकाने मयुर राजु चव्हाण २३ रा चोपन, उमेश अनिल आडे ३१ रा वसंतनगर, निखिल यादव खैरे ३० रा उमरी रोड, अलताफ मोहम्मद अनिस अकबाणी २३ रा तुकंदम तलाव चंद्रपुर यांना अटक केली होती. सद्या वरील सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. तालुक्यातील युवकांची बनावट बॅक खाते काढुन त्यातुन अवैद्य मार्गाने क्रीकेट सट्ट्याच्या पैशाची हेराफेरी करण्यात आली होती. एलसिबीच्या पथकाने आज पर्यत या प्रकरणात एकुण पाच आरोपींना अटक केली आहे.

या प्रकरणातील आणखीनही मोठे मासे पोलीसांच्या गळाला लागलेले नाही. पोलीस कोठडीत असलेल्या सारंग साठवणेची चौकशी सुरु आहे. परंतु त्याने चौकशीमध्ये पुन्हा कोणकोणत्या आरोपींची नावे चौकशी अधिकार्‍यास सांगितली याची माहिती मिळु शकली नाही. संपुर्ण विदर्भभर जाळे पसरलेल्या क्रीकेट सट्ट्याच्या, पैशाच्या या हेराफेरीच्या प्रकरणात पांढरकवडा येथील काही सटोडीयांचा सुध्दा सहभाग असल्याची चर्चा आहे. त्या दिशेने सुध्दा एलसिबीच्या पथकाने तपास करण्याची मागणी येथे होवु लागली आहे.