भरदिवसा तरुणाची गोळया झाडून हत्त्या ; आरोपीचे पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण
नागपूर : जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात खापामधील बाजार चौकात जुन्या वैरातून भरदिवसा एका युवकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. चेतन गागाटे (२५) असे मृत युवकाचे नाव आहे, तर अर्जुन निळे असे आरोपीचे नाव असून त्याने घटनेनंतर थेट खापा पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले आहे.
वृत्तानुसार, सकाळी साडेदहा वाजता दरम्यान खापातील देना बँकजवळ चेतन गागाटे आणि अर्जुन निळे यांच्यात काही कारणावरून वाद झाला. त्यानंतर चेतन तेथून निघून गेला. मात्र, संतप्त झालेल्या अर्जुनने आपल्याकडे असलेली माउझर पिस्तूल घेऊन चेतनचा पाठलाग केला. बाजार चौकात चेतन दिसताच अर्जुनने त्याच्या छातीत तीन गोळ्या झाडल्या. यापैकी दोन गोळ्या चेतनच्या छातीत घुसल्या, तर एक गोळी चुकली. गोळी लागल्याने चेतन तिथेच कोसळला. घटनेनंतर अर्जुन थेट खापा पोलीस ठाण्यात गेला आणि स्वतःहून आत्मसमर्पण करत हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि गंभीर जखमी चेतनला नागपूरच्या मॅक्स रुग्णालयात हलवण्यात आले. सुमारे एक तास त्याचा श्वास सुरू होता, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांच्या माहितीनुसार, चेतन आणि अर्जुन यांच्यात सात वर्षांपूर्वीपासून जुना वाद होता. एका मंडई कार्यक्रमात चेतनच्या चुलत भावाने अर्जुनवर चाकू हल्ला केला होता. या प्रकरणात चेतनवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी निर्माण झालेली वैरभावना आज चेतनच्या जीवावर बेतली. आरोपी अर्जुन निळे याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून माउझर जप्त करण्यात आले असून हे शस्त्र त्याच्याकडे कुठून आले, याचाही तपास सुरु आहे.

