गोरेवाडा तलावात बुडून दोन भावंडांचा मृत्यू ; दारूच्या नशेत आंघोळीसाठी उतरले होते पाण्यात
नागपूर : मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेल्या दोन भावंडांचा गोरेवाडा तलावात बुडून मृत्यू झाला. प्रचंड उकाडा असल्याने दोघेही पाण्यात आंघोळीसाठी उतरले होते. दारूच्या नशेत असल्याने त्यांना पाण्याच्या अंदाज घेता आला नाही. काही वेळातच ते गटांगळ्या खाऊ लागले आणि क्षणात दिसेनासे झाले. ही धक्कादायक घटना गिट्टीखदान पोलिस ठाण्यांतर्गत दुपारी साडेचारच्या सुमारास उघडकीस आली.
सतीश रामराज देशभ्रतार (वय 18) आणि अनिकेत धनराज बडगे (वय 18, दोन्ही रा. मानवतानगर, टीव्ही टॉवर) अशी बुडालेल्या युवकांची नावे आहेत. ते मामेभाऊ आतेभाऊ आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. मनपा अग्निशमन यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला माहिती दिली. रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती. सतिश हा पेंटीगचे काम करायचा. त्याचे वडील ई-रिक्षा चालवतात. अनिकेत हा एका खाजगी रुग्णालयात काम करत होता. सकाळी दोघेही परिसरातच राहणारे मित्र साहिल कैलास चौरे (वय 21), यश आदेश उके (वय 17) आणि कुणाल सुधाकर उके (वय 13) यांच्यासोबत पार्टी करण्यासाठी गोरेवाडा तलाव परिसरात गेले होते.

पाच जणांपैकी कोणालाच पोहता येत नव्हते. त्यामुळे ते तलावाच्या काठाने उभे होते. काही वेळाने साहिल, यश आणि कुणाल हे मोबाईलने सेल्फी घेत काही अंतरावर निघून गेले. त्याचदरम्यान सतीश आणि अनिकेत आंघोळ करण्यासाठी तलावाच्या पाण्यात उतरले. त्यामध्येच त्यांचा बुडून मृत्यू झाला.

