चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करत कट मारली; भरधाव दुचाकीस्वारामुळे ३६ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू
पत्नी व मुलगी किरकोळ जखमी, कुही पोलिसांत गुन्हा दाखल
कुही : पोलीस स्टेशन अंतर्गत मांढळ पोलीस चौकी हद्दीत भरधाव दुचाकीस्वाराने चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करत कट मारल्याने झालेल्या भीषण अपघातात ३६ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मृताची पत्नी व मुलगी किरकोळ जखमी झाल्या असून, कुही पोलिसांनी आरोपी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिमा रामभाऊ खेडेकर (रा. देवळी कला, ता. कुही) या आपल्या पती रामभाऊ रामदास खेडेकर (वय ३६) व मुलीसह माडगी टेकेपार (जि. भंडारा) येथे लग्नकार्याकरिता गेल्या होत्या. लग्न आटोपून तिघेही दुचाकीने देवळी कला येथे परतत असताना मांढळ समोरील नायरा पेट्रोल पंपाजवळ मागून येणाऱ्या एका दुचाकीस्वाराने अतिवेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवत डाव्या बाजूने (चुकीच्या बाजूने) ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला.
या दरम्यान संबंधित दुचाकीस्वाराने अचानक कट मारल्याने रामभाऊ खेडेकर यांच्या दुचाकीचा तोल गेला आणि तिघेही रस्त्यावर कोसळले. अपघातात सिमा खेडेकर व त्यांची मुलगी किरकोळ जखमी झाल्या, मात्र रामभाऊ खेडेकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलीस कारवाई
या प्रकरणी सिमा खेडेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून कुही पोलीस स्टेशनमध्ये आरोपी दुचाकीस्वाराविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २८१, १२५(अ), १०६(१) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४, १३४/१७७ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.







