पत्नी व मुलाचा गळा चिरून युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

 पत्नी व मुलाचा गळा चिरून युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

नागपूर : एका व्यावसायिक युवकाने झोपेत असलेल्या पत्नीचा गळा चिरला तसेच मुलावरही चाकुने हल्ला केला. मात्र, दुसऱ्या मुलाने लगेच शेजाऱ्यांना आवाज दिला. दरम्यान, त्या युवकाने स्वत:चाही गळा चिरुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शेजाऱ्यांनी त्या युवकाला पकडले आणि जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले. ही थरारक घटना सोमवारी पहाटे पाच वाजता नंदनवनमध्ये उघडकीस आली. पिंकी नांदूरकर (३२, बगडगंज) असे जखमी महिलेचे नाव आहे तर रवी नांदूरकर असे आरोपी युवकाचे नाव आहे.

आठ दिवसांपूर्वी खरेदी केला चाकू

नंदनवन परिसरात रवीचे वाहनांना कुशन लावण्याचा व्यवसाय आहे. पत्नी पिंकी आणि दोन मुलांसह तो राहतो. गेल्या काही दिवसांपासून तो तणावात होता. त्याने गांधीबागमधून गेल्या आठ दिवसांपूर्वी चाकू विकत घेतला. त्याला पत्नी व मुलांना संपवायचे होते. त्यानंतर स्वत:ही आत्महत्या करायची होती. रविवारी रात्री पत्नी व मुलांसह त्याने जेवण केले आणि सर्व जण झोपी गेले. पहाटे पाच वाजताच्या सुमारास रवी झोपेतून उठला. त्याने उशीखाली लपवून ठेवलेला चाकू काढला आणि पत्नीच्या गळ्यावरुन फिरवला. या हल्ल्यामुळे पत्नी मोठ्याने ओरडली. तर बाजुला झोपलेले ११ आणि १३ वर्षांची दोन्ही मुले झोपेतून उठली. त्यानंतर रवीने मोठ्या मुलावरही चाकुने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलाने वार हुकवला. चाकू मुलाच्या बोटाला लागल्याने त्याची दोन बोटे कापल्या गेली. लहान मुलाने आरडाओरड करीत शेजाऱ्यांना आवाज दिला. शेजारी धावतच घरात आले. त्यावेळी पिंकी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती तर मोठा मुलगाही जखमी अवस्थेत होता. दरम्यान, रवीने स्वत:चाही गळा चिरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन लावला आणि रवीला पकडून ठेवले. पोलिसांनी लगेच जखमी पिंकी, रवी आणि मुलाला मेडिकल रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु असून पिंकी यांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

…तर तुला मोक्ष मिळेल

“तू तुझ्या पत्नीला व मुलांना संपवून टाक… त्यानंतर तू स्वर्गात ये… तुला मोक्ष मिळेल,’ असा आवाज गेल्या सहा महिन्यांपासून येत असून त्या आवाजाकडे मी आकर्षित झालो आहे. त्यामुळे पत्नी व मुलांना संपवून टाकल्यानंतर स्वत:ही आत्महत्या करणार होतो, त्यामुळे मी पत्नी व मुलांचा खून करणार होतो. झोपेत असलेल्या पत्नीचा गळा चिरला आणि एका मुलावरही हल्ला केला. मात्र, ते दोघेही थोडक्यात वाचले, अशी धक्कादायक माहिती युवकाने पोलिसांना दिली.