पतीचा जाचाला कंटाळून सैनिकाच्या पत्नीची आत्महत्या; प्रेमकहाणीचा दुखद अंत
मौदा: ‘तुझं माझ्यावर पूर्वीसारखे प्रेम नाही. त्यामुळेच तू माझा नेहमी मानसिक व शारीरिक छळ करतोस. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे’ अशी सुसाईड नोट लिहून एका सैनिकाच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना मौदा येथे घडली. प्रज्ञा मोहन सदांशिव (२५,रा. मौदा, एनटीपीसी वसाहत) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन सदांशिव हा मूळचा अचलपूर तालुक्यातील रहिवाशी असून तो केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (सीआयएसएफ) सैनिक आहे. त्याचे मामाची मुलगी प्रज्ञा हिच्यावर प्रेम होते. दोघांनी २०१९ मध्ये प्रेमविवाह केला. लग्नाला ६ वर्षे झाले तरी त्यांना मुलबाळ नव्हते. त्यामुळे मोहन नेहमी तणावात राहत होता. दारुच्या नशेत तो पत्नीला मारहाण करीत होता, तिचा मानसिक व शारीरिक छळ करीत होता, तसेच तिचा चारित्र्यावर संशय घेत होता.

मोहन ड्युटीवर गेल्यानंतर तिने एक चिठ्ठी लिहिली. त्यात पती मोहनच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख केला. त्यानंतर तिने मोहनला फोन केला. ‘मी आता गळफास घेऊन आत्महत्या करीत आहे. त्यावर मोहनने तिला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मौदा पोलिसांनी या प्रकरणी पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा मोहनवर दाखल केला. पत्नीच्या अंत्यसंस्कारानंतर त्याला अटक करण्यात येणार आहे, अशी माहिती मौदा पोलिसांनी दिली.


