हिंगणा वनपरिक्षेत्रात वनविभागाची कारवाई ; सागवानाच्या लाकडाने भरलेला ट्रक जप्त
नागपूर : जिल्ह्यातील हिंगणा वनपरिक्षेत्रातील पथकाने अवैधरीत्या सागवानाची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर मोठी कारवाई केली आहे. गस्तीदरम्यान ही कारवाई करण्यात आली असून दोन लाख रुपयांहून अधिक किमतीचा सागवान लाकडासह ट्रक जप्त करण्यात आला आहे. वनविभागाने गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरु केला आहे.
हिंगणा वनपरिक्षेत्रातील पथक नेहमीप्रमाणे रात्रीच्या गस्तीसाठी असतांना या दरम्यान संशयास्पद अवस्थेत जात असलेला एक ट्रक पथकाला दिसला. पथकाने तातडीने ट्रक थांबवून चौकशी केली असता ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर सागवानाचे लाकूड आढळून आले. सदर ट्रकचालकाकडून लाकडाच्या वाहतुकीसाठी आवश्यक परवानगीचे कागदपत्रे मागितले असता, तो एकही अधिकृत दस्तऐवज सादर करू शकला नाही. त्यामुळे वनविभागाने ट्रकसह सर्व लाकूड ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेल्या सागवान लाकडाची किंमत दोन लाख रुपयांहून अधिक असल्याचे समजते.

वनविभागाकडून या घटनेची नोंद घेऊन पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणामागे नेमके कोणते रॅकेट कार्यरत आहे, याचा तपास करण्यासाठी अधिकाऱ्यांनी विशेष पथक नियुक्त केल्याचे समजते.


