मांढळ – वेलतूर मार्गावर दुचाकी आणि मॅक्सची समोरासमोर धडक ; युवकाचा मृत्यू तर मॅक्स चालक जखमी
कुही : तालुक्यातील वेलतूर ते मांढळ दरम्यान पचखेडी येथील पांडू ढाब्यासमोर मंगळवार दि.१७ ला सायंकाळी ७:४५ वाजताच्या सुमारास काळजाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात घडला. दुचाकी आणि मॅक्स गाडीची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या या अपघातात २४ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. उज्ज्वल ज्ञानेश्वर ठाकरे (वय २४) रा.मांढळ असे मृत तरुणाचे नाव असून,जखमी चालकाचे नाव प्रशांत कोहळे रा.कुही असे आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
उज्ज्वल ठाकरे हा आपल्या दुचाकीने आंभोऱ्यांवरून महाआरती आटोपून मांढळ कडे परत येत होता. यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या मॅक्स गाडीशी त्याची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीचा पुढच्या भाग चक्काचूर झाला आणि उज्ज्वल रस्त्यावर फेकला गेल्याने त्याच्या डोक्याला, चेहऱ्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली. अतिरक्तस्रावामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मॅक्स गाडी क्र.एम एच ३८ – ०४९२ चे ही मोठे नुकसान झाले असून चालक प्रशांत कोहळे गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी चालकाला नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

अवघ्या २४ वर्षांच्या उज्ज्वलचा असा दुर्दैवी अंत झाल्याने ठाकरे कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. तो मनमिळावू स्वभावाचा असल्याने मित्रपरिवार आणि गावात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच वेलतुर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असून, दोन्ही वाहने ताब्यात घेतली आहेत. मृतक उज्ज्वल हा ठाकरे कृषी केंद्र मांढळ चे मालक ज्ञानेश्वर ठाकरे यांचा एकुलता एक मुलगा होता. युवा मुलगा अपघातात इहलोक सोडून गेल्याने ठाकरे कुटूंबियाबर फार मोठा आघात झालेला आहे.







