नागपूर शहरात तणावपूर्ण शांतता; १५० पेक्षा अधिक दंगलखोर अटकेत
नागपूर: नागपुरात महाल परिसरात औरंगजेबची प्रतिकात्मक कबर जाळल्यानंतर संघर्ष पेटला. यात युवकांनी तुफान दगडफेक केली. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागपुरातील अर्ध्या अधिक भागात संचारबंदी जाहीर केली आहे. तरीही शहरात सध्या तणावपूर्ण शांतता असल्याची स्थिती आहे.
शहरातील कोतवाली, तहसील, लकडगंज, नंदनवन, सदर, महाल यासह अन्य परिसरात पोलिसांचा मोठा ताफा तैनात आहे. या परिसराकडे येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी सुरू असून संशयित व्यक्तीला सुद्धा ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत आहे. रस्त्यावर पोलिसांनी बॅरिकॅडिंग केली आहे. गांधी गेट, महाल चिटणीस पार्क चौक यासह अन्य भागात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सशस्त्र जवानाना तैनात केले आहे. सोमवारी उसळलेल्या हिंसाचाराचे पडसाद संपूर्ण शहरभर दिसत असून सध्या शहरात तणावपूर्ण शांततेचे वातावरण आहे. हिंसाचाराग्रस्त भागात नागरिकांना मदत करण्यासाठी पोलीस वेळेवर पोहोचले नाही. त्यामुळे हंसापुरी या परिसरात अनेक सामान्य नागरिकांच्या वाहनांचे आणि घरांचे नुकसान झाले आहे. या सर्व घटनेला नागपूर पोलीस जबाबदार आहेत असा आरोप नागरिकांनी केला आहे.

अशोक चौकापासून ते इतवारी पर्यंत तसेच महाल पासून तर शुक्रवारी तलावापर्यंत रस्ते सूनसान होते. रस्त्यावर एकही वाहन दिसत नव्हते. या भागातील प्रत्येक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पोलिसांची गर्दी दिसत आहे. त्यामुळे सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे बोलले जाते. याप्रकरणी पोलिसांनी १५० पेक्षा अधिक लोकांवर गुन्हे दाखल करून अटक केली आहे.
