शासकीय योजनेसाठी मुलींच्या अर्धनग्न फोटोंची मागणी, शाळेकडून पालकांना आलेल्या WhatsApp मेसेजनं खळबळ
नागपूर : शहरातून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. शाळेत शैक्षणिक कामाची बतावणी करून अल्पवयीन विद्यार्थिनींचे अर्धनग्न फोटो व्हाट्सएपवर मागवण्याच्या धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आलं आहे. पालकांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपुराच्या महाल परिसरातील एका शाळेतील सहावी ते आठवी या वर्गातील मुलींच्या पालकांना व्हाट्सएपवर मॅसेज आले. यात शाळेतील शिक्षिका असल्याची आरोपीने बतावणी केली आणि शैक्षणिक कामासाठी सुरवातीला मुलींचे पासपोर्ट फोटो पाठण्याचा संदेश मुलींच्या पालकांना व्हाट्सएपवर दिला.
दरम्यान, काही पालकांनी खरंच शाळेतील शिक्षिकेचा नंबर आहे का? याची कुठलीही खातरजमा न करता अनोळखी व्हाट्सएप क्रमांकावर मुलींचे पासपोर्ट फोटो पाठवले. मात्र, थोड्या वेळानंतर एका शासकीय योजनेसाठी मुलींचे अर्धनग्न फोटोंची मागणी त्या अज्ञात आरोपीने व्हाट्सअप मेसेज द्वारे पालकांकडे केली. त्यानंतर मात्र पालकांना शंका आली, शाळेतील शिक्षकांकडे यासंबंधी माहिती घेतल्यावर शाळेने कोणतेही फोटो मागितले नसल्याचे समोर आले आणि कोणीतरी हा गैरप्रकार केल्याचे समोर आले. पुढे आलेल्या माहितीनुसार, शाळेतील 15 ते 16 मुलींच्या पालकांसोबत हा गैरप्रकार झाला आहे. याप्रकरणी पालकांच्या तक्रारीवरून नागपूरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात सायबर कायद्यासह इतर कालामंतार्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र या प्रकरणाने शहरात एकच खळबळ उडाली आहे.


