नागपूर : प्रेमाचा त्रिकोण ; हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्याची हत्या
नागपूर : प्रेमाच्या त्रिकोणातून एका तरुणाची अमानुषपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलासह चौघांनी एकत्र येत, तरुणाला भेटण्याच्या बहाण्याने बोलावून गोरेवाडा परिसरात त्याची निर्घृण हत्या केली. एका आरोपीने पोलिस ठाण्यात हजेरी लावत ही माहिती दिली. मृत तरुणाची ओळख अमन राजेंद्र ध्रुववंशी (२०, रा. महाराणा अपार्टमेंट, स्वामी नगर, गोरेवाडा) अशी झाली आहे. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. आरोपींमध्ये लकी सुनील मेंढेवार (१८, रा. स्वीपर कॉलनी, गंगाबाई घाट), अभिषेक राजेश कटारिया (२०), सुलभ ठाकूर (१९, रा. गोरेवाडा) व एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा यांचा समावेश आहे.
मृतक अमन हा शिमला येथील एका कॉलेजमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेत होता. लकी व इतर आरोपी हे खाजगी संस्थांमध्ये हाउसकीपिंगचं काम करतात. ‘रोज’ नावाच्या तरुणीशी अमन व लकी दोघांचे प्रेमसंबंध होते, पण दोघांनाही एकमेकांबाबत माहिती नव्हती. काही महिन्यांपूर्वी अमन आणि रोज फिरायला गेले असताना अपघात झाला आणि लकीला त्यांच्या संबंधाची माहिती मिळाली. त्यानंतर वाद झाले, अमनने संबंध तोडले, पण लकीला संशय कायम राहिला. लकीने रोजच्या नावाने बनावट इंस्टाग्राम आयडी तयार करून अमनशी चॅटिंग सुरू केली. शनिवारी रात्री त्याने त्याच आयडीवरून अमनला मिलिटरी ग्राउंडजवळ बोलावले. लकी व अभिषेक तिथे पोहोचले. अमन आल्यावर त्यांचात वाद सुरू झाला. अमनने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला, पण लकीने चॅटिंगचे पुरावे दाखवले.

त्यांनी अमनला दुचाकीवर बसवून गोरेवाडा जंगलातील टेकडीवर नेले. तिथे अन्य आरोपी आले. चारही जणांनी अमनवर हल्ला केला. त्याच दरम्यान लकीने चाकूने अमनच्या छातीवर वार केला. अमनचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर चारही जण घरी पळून गेले. रात्रभर ते घरीच लपून बसले. मात्र, अभिषेक घाबरून रविवारी मानकापूर पोलीस ठाण्यात पोहोचला आणि त्याने हत्येची कबुली दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अमनचा मृतदेह ताब्यात घेत मेयो रुग्णालयात पाठवला. अभिषेकच्या सांगण्यावरून अन्य तिघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

