नागपुरातील कंपनीत स्फोट : उकळते पाणी अंगावर पडून एका कामगाराचा मृत्यू ; सहा गंभीर जखमी
नागपूर : जिल्ह्यातील भीलगावजवळील खैरी येथील ‘अंकित पल्प्स अॅण्ड बोर्ड्स मायक्रोक्रिस्टलाइन सेल्युलोज’ या कंपनीत सकाळी भीषण स्फोट झाला. या स्फोटात सुधीर कालबांडे (रा. कांद्री, कन्हान) या कामगाराचा मृत्यू झाला. तर 6 कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, जखमींवर कामठीच्या सिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही कंपनी फार्मास्युटिकल एक्ससिपियंट्स आणि अन्नातील योजक यांचे उत्पादन आणि वितरण करणारी एक औद्योगिक संस्था आहे. सकाळी ९ वाजता कंपनीच्या ‘डी-एक्शन सेक्शन’ मध्ये ही दुर्घटना घडली.
प्राथमिक माहितीनुसार, कामगार रिअॅक्टरवर काम करत असताना अचानक विस्फोट झाला आणि त्यामधून उकळते पाणी कामगारांच्या अंगावर पडले. त्यामुळे गंभीर भाजल्यामुळे एका कामगाराचा मृत्यू झाला तर इतर सहा जण जखमी झाले. जखमी झालेल्यांमध्ये दिनेश टेबूरणे, मंगेश राऊत, युनुस खान, स्वप्नदीप वैद्य, आशिष वाढगुळे यांचा समावेश आहे. यापैकी चार जणांची प्रकृती अत्यवस्थ असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. कंपनी प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना अचानक झालेल्या यांत्रिक बिघाडामुळे घडली असावी. मात्र कामगार संघटनांनी सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत कंपनीकडून उत्तरदायित्वाची मागणी केली आहे.

ही घटना औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर मानली जात असून प्रशासनाने तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. कामगारांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांची तपासणी करण्यात येणार असून दोषी ठरल्यास कंपनीवर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. सध्या कंपनीतील उत्पादन कार्य काही काळासाठी बंद ठेवण्यात आले आहे. या दुर्घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कामगारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.


