लाडक्या बहिणींना ई-केवायसी साठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ ; राज्य शाषणाचा मोठा निर्णय
मुंबई : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. लाभार्थींना आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ई-केवायसी पूर्ण करता येणार आहे. म्हणजेच या प्रक्रियेसाठी अधिकचे ४३ दिवस मिळाले आहेत. ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्यांच्यासाठीही नियमावली स्पष्ट करण्यात आली आहे.
संबंधित महिलांनी स्वतःचे ई-केवायसी स्वत: करावे, आणि त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला आणि बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी, असे महिला आणि बाल विकास विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक अपात्र महिला आणि पुरुषांनीही घेतल्याने निदर्शनास आले होते. अपात्रांना सेवेतून वगळून सरकारी निधीची बचत करण्यासाठी लाभार्थींची ई-केवायसी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यासाठी १८ सप्टेंबरपासून विशेष मोहिमेला सुरुवात केली होती. ई-केवायसी करण्याची मुदत १८ नोव्हेंबरपर्यंतच होती. परंतु ही प्रक्रिया करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे ही मुदत वाढवणार की नाही, याकडे लाखो महिलांचे लक्ष लागून होते. परंतु लाभार्थी महिलांना राज्य सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे.

महिला व बालविकास विभागाने याविषयी माहिती देत ही मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात येत असल्याचे जाहीर केले. ‘ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे. त्या लाभार्थी महिलांनी स्वतः ई-केवायसी करावे आणि त्यांचे पती किंवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी. या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे.’






