लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात ; सातबारावर पिकाची नोंद करण्यासाठी मागितली लाच

लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात

सातबारावर पिकाची नोंद करण्यासाठी मागितली लाच

उमरेड :- शेताच्या सातबारावर कपाशीच्या पिकाची नोंद करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महिला तलाठ्यासह अन्य एकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने अटक केली. ही कारवाई उमरेड तहसील कार्यालयात मंगळवारी (दि. १७) दुपारी ३ वाजताच्या सुमारास करण्यास आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये लाचखोर तलाठी रूपाली अरविंद मानकर (२८) व आशिष गुलाब देशमुख रा. ठाणा, ता. उमरेड या दोघांचा समावेश असून, आशिष हा तिला मदत करायचा. त्या कळमना, ता. उमरेड येथील तलाठी कार्यालयात कार्यरत होत्या. तक्रारकर्ता हा म्हसाळा (दिघोरी), ता. उमरेड येथील रहिवासी असून, त्याच्या आईच्या नावे म्हसाळा (दिघोरी) शिवारात शेती आहे. हा संपूर्ण शिवार जंगलव्याप्त असल्याने पिकांचे नुकसान करणाऱ्या वन्यप्राण्यांचा शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो.यावर्षी त्याने शेतात कपाशीची लागवड केली होती.वन्यप्राण्यांनी त्याच्या शेतातील कपाशीच्या पिकाचे प्रचंड नुकसान केल्याने त्याने वन विभागाकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती. ही नुकसान भरपाई मिळण्यासाठी सातबारावर कपाशीच्या पेऱ्याची नोंद हवी होती. ही नोंद करण्यासाठी रूपाली मानकरने त्याला तीन हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती दोन हजार रुपये देण्याचे तरुणाने मान्य केले. त्याला लाच द्यायची नसल्याने त्याने एसीबीकडे तक्रार केली होती. ठरल्याप्रमाणे रूपाली मानकरने आशिष देशमुखच्या माध्यमातून ही लाच स्वीकारली आणि एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेत दोघांनाही अटक केली. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अप्पर पोलिस अधीक्षक संजय पुरंदरे, उपअधीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक आशिष चौधरी व वर्षा मते, सरिता राऊत, अमोल घरे, भरत ठाकूर, भागवत वानखेडे, विजय सोळंकी, सचिन चन्ने यांच्या पथकाने केली.