Home क्राईम कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलेल्या आठ महिन्याच्या चिमुकलीचा निर्दयी अंत

कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलेल्या आठ महिन्याच्या चिमुकलीचा निर्दयी अंत

कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलेल्या आठ महिन्याच्या चिमुकलीचा निर्दयी अंत

नागपूर : शहरातील हिलटॉप परिसरात बुधवारी सकाळी धक्कादायक घटना उघडकिस आली. अवघ्या आठ महिन्यांच्या चिमुकलीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिल्याचा अमानुष प्रकार समोर आला असून, दुर्गंधीमुळे श्वास गुदमरल्याने तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. ही घटना हिलटॉप परिसरातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या कार्यालयालगत असलेल्या गोदावरी अपार्टमेंटसमोर घडली.

स्थानिक नागरिकांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यात संशयास्पद हालचाल दिसल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता, एका लहान मुलीचा मृतदेह आढळून आला. अंगावर एकही कपडा नसलेल्या अवस्थेत चिमुकली कचऱ्यात पडलेली पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अंबाझरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) पाठवला आहे. प्राथमिक तपासात रात्रीच्या अंधारात कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चिमुकलीला येथे आणून टाकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

अंबाझरी पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. तसेच गेल्या काही महिन्यांमध्ये परिसरात झालेल्या बाळंतपणाची माहिती गोळा करण्यात येत आहे. अनैतिक संबंधांमधून या चिमुकलीचा जन्म झाला असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात असली, तरी तपास पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणे घाईचे ठरणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Don`t copy text!