शिवीगाळ करतोय म्हणून टोकलं ; तरुणानं चाकू हल्ला करित केला शेजाऱ्याचा खून
नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरात दिवसेंदिवस गुन्हेगारीत वाढ होत आहेत. शहरात हत्येची मालिका सुरूच आहे. रात्री नागपूरच्या धंतोली पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या राहुल नगर झोपडपट्टी परिसरात एका तरुणाला शिवीगाळ करण्यापासून रोखणे शेजाऱ्याला चांगलेच महागात पडले. रागाच्या भरात आरोपी तरुणाने चाकूने वार करून त्याची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. मृतकाचे नाव अंकुश देवगिरकर (35) असे आहे, तर आरोपीचे नाव आयुष मंडपे (19) असून तो बीएससी प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री आयुष आपल्या मित्रांसोबत दारू पिऊन झोपडपट्टीतील चौकात शिवीगाळ करत होता. यावेळी तिथे आलेल्या अंकुशने त्याला शिवीगाळ करू नको असे सांगितले. या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात अंकुशने आयुषची कॉलर पकडली. यामुळे संतापलेल्या आयुषने घरी जाऊन भाजी चिरण्याचा चाकू आणला आणि अंकुशवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात अंकुश गंभीररित्या जखमी झाला. त्या अवस्थेतच स्थानिकांनी अंकुशला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

धंतोली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आयुषला छत्रपती चौक परिसरातून अटक केली. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका १९ वर्षीय तरुणानं क्षुल्लक कारणाने शेजारच्याचा केलेला खून हे परिसरासाठी आणि शहरासाठी हादरवणार आहे. वारंवार घडणाऱ्या हत्या आणि गुन्ह्यांमुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


