इनामी शंकरपटात बैलजोडीचा हार-जितीचा वाद; तिघांची शेतकऱ्याला मारहाण

इनामी शंकरपटात बैलजोडीचा हार-जितीचा वाद

तिघांची शेतकऱ्याला मारहाण

कुही:- शंकरपटात झालेल्या हार जीतीच्या वादातून 3 युवकांनी शंकरपट आयोजक पंचकमेटीतील युवकाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली आहे. जखमी युवकाच्या तक्रारीवरून मारहाण करणाऱ्या 3 युवकांविरुद्ध कुही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी  (दि.17) तालुक्यातील मौजा-ससेगाव येथे ईनामी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले होते.  मेंढेगाव येथील शेतकरी योगेश्वर गजानन मानमोडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार  ते ससेगाव येथे  दुपारी 4 वाजता शंकरपट पाहण्यास गेले होते. पट पाहून सायंकाळी 6.30 ला आपल्या चारचाकी वाहनाने गावाकडे परत निघाले होते. दरम्यान त्यांची गाडी मुख्य रस्त्यावर येताच प्रफुल बखाल, प्रज्वल बखाल, गौरव तिडके यांनी गाडी रोखली व योगेश्वर यांना गाडीबाहेर काढून चाबी हिसकून घेत आमच्या बैलजोडीचा निर्णय लाऊन दे म्हटले. यावर योगेश्वर यांनी आमची पंचकमेटी आल्यावर याबाबत निर्णय घेईल असे सांगितले. मात्र  प्रफुल बखाल याने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली सोबत असलेले प्रज्वल बखाल व गौरव तिडके यांनी ओढतान करीत तिघांनीही हातबुक्क्यांने बेदम मारहाण केली. मध्यस्ती करत त्यांना वाचविण्यासाठी रोषण खडसे आले असता आरोपींनी त्यांनाही मारहाण करण्यात आली. योगेश्वर मानमोडे यांनी दिलेल्या तक्रारी नुसार प्रफुल बखाल, प्रज्वल बखाल रा. खापरी (बखाल) ता. कुही. व गौरव तिडके रा. अडयाळी ता. जि. नागपूर यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कुही पोलीस करीत आहे.