हवाला व क्रिकेट सट्ट्यातील ‘ब्लॅक’चे कोट्यवधी रुपये ‘व्हाइट’ करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश ; आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

हवाला व क्रिकेट सट्ट्यातील ‘ब्लॅक’चे कोट्यवधी रुपये ‘व्हाइट’ करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश ; आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर : हवाला व क्रिकेट सट्ट्यातील ‘ब्लॅक’चे कोट्यवधी रुपये ‘व्हाइट’ केले. गुन्हेशाखा पोलिसांनी कुख्यात बंटी शाहूकडून चालविण्यात येणाऱ्या या रॅकेटचा पर्दाफाश केला. पोलिसांनी बंटीसह आठ जणांविरुद्ध लकडगंज पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. बंटीला भंगार चोरीच्या प्रकरणात अनेकदा अटक झाली आहे. बंटी शाहू, जयेश शाहू, अविनाश शाहू, ऋषी लाखानी, आनंद हरडे, राजेश शाहू, ब्रिजकिशोर मणीहार व अंशुल मिश्रा अशी आरोपींची नावे आहेत. बिस्वजित सुधांशू रॉय (वय ३९, रा. बंगाली पंजा) यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

प्राप्त माहितीनुसार, बिस्वजित हे मूळ पश्चिम बंगालमधील हुगळी येथील रहिवासी आहेत. त्यांच्या गावातील रहिवासी व मित्र सूरज ऊर्फ प्रीतम केडिया हा नागपुरात काम करायचा. त्यांनी प्रीतमला नागपुरात काम शोधण्यास सांगितले. जून २०२४ मध्ये बिस्वजित हे नागपुरात आले. सूरजने बिस्वजित यांची ओळख बंटी, जयेश, अविनाश, ऋषी, आनंद, राजेश, ब्रिजकिशोर व अंशुल याच्यासोबत करून दिली. तुमच्या नावाने बाजारात गुंतवणूक करू, त्यातील नफ्याची ठराविक रक्कम तुम्हाला मिळेल’, असे आमिष बंटी व त्याच्या साथीदारांनी बिस्वजित यांना दाखविले. आर्थिक चणचणीमुळे त्यांनी होकार दिला. बंटीने त्यांच्याकडून आधारकार्ड, पॅनकार्ड व अन्य दस्तऐवज घेतले. कोऱ्या दस्तऐवजांवर त्यांची स्वाक्षरी घेतली. दस्तऐवज घेतल्यानंतर बंटी, अविनाश व त्याच्या साथीदारांनी बिस्वजित यांच्या नावे क्षितिज इंटरप्राइजेस नावाची कंपनी स्थापन केली.

कंपनीच्या नावे विविध प्रतिष्ठान व दुकानदारांना माल विकल्याचे बोगस बिल तयार केले. प्रत्यक्षात कोणताही माल विकला नाही. हवाला व क्रिकेट सट्ट्याची रक्कम बँकेत जमा केली. ती काढून संबंधित व्यापारांना परत देण्यात येत होती. ९ सप्टेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या कालावधीत बिस्वजित यांच्या नावे असलेल्या कंपनीतून ९६ कोटी ३९ लाखांचा व्यवहार केला. आपल्या नावे बोगस कंपनी स्थापन करण्यात आल्याची माहिती बिस्वजित यांना मिळाली. त्यांनी गुन्हेशाखेत तक्रार केली. गुन्हेशाखेने तपास करून लकडगंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी बंटी, जयेश, ऋषी, आनंद व ब्रिजकिशोरला अटक केली. त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.