कुही :- शासन स्तरावर पावसाळापूर्व कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. मात्र कुही नगरपंचायत अद्यापही कुंभकर्णी झोपेत असून तीन महिन्यांपेक्षाही जास्त कालावधी लोटूनही माझी वसुंधरा योजने अंतर्गत तलाव व विहिरी पुनर्जीवन करण्यासह वृक्षलागवडीची कामे अद्यापही प्रलंबित असून नगरपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
नगर पंचायत तर्फे माझी वसुंधरा अंतर्गत बक्षीस रक्कम योजनेतून शहरात विविध विकास कामांसाठी निविदा प्रक्रिया राबवत कामांचे कॉन्टॅक्ट देण्यात आले आहे. यात शहरात विविध ठिकाणी वृक्ष लागवड करणे, वृक्षारोपण आणि उद्यान विकास, पाण्याची टाकी परिसरात रोपवाटिका तयार करणे, सांस्कृतिक भवन व नगरपंचायत इमारतीत रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे, तलाव व विहीर पुनर्जीवन करणे आदी कामे करणे होते. विशेष म्हणजे संपूर्ण कामे एकाच कंत्राटदाराला असूनही बहुमतांशी कामांचा कार्यारंभ आदेश फेब्रुवारी महिन्यात झाला आहे. तर हे काम कार्यारंभ आदेश दिल्यापासून तीन महिन्यात करणे अनिवार्य असूनही जास्तीचा कालावधी लोटला आहे. मात्र अजूनही परिस्थिती जैसे थे स्वरुपात आहे. प्रामुख्याने शहरातील सार्वजनिक विहिरी सह तलावांची अद्याप सफाई झाली नसल्याने त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असून विहिरी कचरा व झुडूपांनी बरबटल्या आहेत. तर तलावांच्या काठावर कचऱ्याची मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मात्र तरीही नगरपंचायत प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसून येत असून याकडे कोण लक्ष देईल असा सवाल कुही शहरातील नागरिक करीत आहेत.
*रेनवॉटर हार्वेस्टिंग कधी करणार

– पावसाळ्याला सुरुवात झाली असून बुधवारी कुही तालुक्यासह शहरात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. नगरपंचायत तर्फे पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी नगरपंचायत कार्यालय व सांस्कृतिक भवन या दोन्ही इमारतीचे पाणी रेनवॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी कंत्राट देऊन त्याचे कार्यारंभ आदेश फेब्रुवारी महिन्यातच दिले आहे. मात्र 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटून पावसाळा लागला मात्र अद्यापही रेनवॉटर हार्वेस्टिंगचे काम पूर्ण न झाल्याने कंत्राटदाराच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.



