गुरे चारण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू
नाग नदी ओलांडून पलीकडे जात असताना घडली घटना
कुही :- गुरे चारण्यासाठी गेलेल्या तरुणाचा नदी पात्र ओलांडून इकडून तिकडे जात असताना पाण्याच्या प्रवाहात वाहून जात त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.18) सकाळी 11.30 वाजता कुही तालुक्यातील खरबी गाव शिवारात घडली.

सुनील अंबादास गायधने (32) रा. खरबी,कुही असे मृत गुराख्याचे नाव आहे. मृतक सुनील हा खरबी गावापासून 2 कि.मी. अंतरावरील नागनदी जवळ गुरे चारण्यासाठी गेला होता. दरम्यान सुनील हा नदी पात्र ओलांडत असतानाच त्याचा तोल जाऊन नागनदीत प्रवाहात वाहून गेला.हा संपूर्ण प्रकार एका गुराख्याने पाहिला असल्याने त्याने आरडाओरडा केला मात्र सुनील वाहून गेला होता.लागलीच याची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच कुही पोलिसांनी घटनास्थळी पोहचून सुनीलची शोधमोहीम राबविली.यावेळी कुहीचे नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे सह तहसील येथील कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान काही वेळातच सुनील नागनदीच्या पात्रात आढळून आला. सुनीलला कुही ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषीत केले. मृतक सुनीलच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असून या घटनेमुळे खरबी गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. कुही पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे.
