Nagpur News : रामटेक तालुक्यातील चारगाव शिवारात शुक्रवारी दुर्दैवी घटना घडली. वीज कोसळून दोन महिला शेतमजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पाच महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
नागपूर : रामटेक तालुक्यातील चारगाव शिवारात शुक्रवारी दुर्दैवी घटना घडली. वीज कोसळून दोन महिला शेतमजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पाच महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. शेतात रोजंदारीवर धान रोवणीचे काम सुरू असताना अचानक आकाशातील संकटामुळे दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रामटेक तहसील येथील शितलवाडी-चारगाव रस्त्यालगत असलेल्या शेतकरी रमेश जगन्नाथ रहाटे यांच्या शेतात ही घटना घडली. मृत महिलांची नावे मंगलाबाई झिबल मोटघरे (४०, रा. शितलवाडी, परसोडा) आणि वर्षा देवचंद हिंगे (३३, रा. भोजापूर) अशी आहेत. दोघीही अनुभवी आणि नियमित मजुरी करणाऱ्या महिला होत्या. शुक्रवारी दुपारी सुमारास सुमारे २५ महिला धान रोवणीसाठी शेतात काम करत होत्या. त्यातील सात महिला जेवणासाठी थोडे बाजूला झाडाखाली बसल्या होत्या. त्याचवेळी वीजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. काही क्षणांतच प्रचंड गडगडाट करत वीज थेट या महिलांच्या दिशेने आली आणि त्या जागीच कोसळल्या.
