कुहीतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद ; 35 पैकी केवळ 7 कॅमेरे सुरू , कूहीतील तिसरा डोळा ठरतोय कुचकामी

कुहीतील सीसीटीव्ही कॅमेरे बंद ; 35 पैकी केवळ 7 कॅमेरे सुरू

कूहीतील तिसरा डोळा ठरतोय कुचकामी

कुही :– वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी व शहर सुरक्षेसाठी नगरपंचायत तर्फे शहरातील प्रमुख चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.मात्र गेल्या काही दिवसांपासून यातील बहुतांशी कॅमेरे बंद पडल्याने हे सीसीटीव्ही कॅमेरे आता शोभेची वास्तू ठरत आहेत.

कुही नगरपंचायत तर्फे शहर सुरक्षेसाठी शहरात ठिकठिकाणी कॅमेरे बसवण्यासाठी निविदा काढत कॅमेरे बसविण्याचे कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात आले होते. त्या अंतर्गत शहरातील मुख्य बस स्थानक, डेपो रोड , टेलीफोन चौक टी-पोईट , मांढळ रोड , शारदा चौक, भारत माता चौक सह इतर काही ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले आहे. विशेष म्हणजे शहरात कुठे काय सुरु आहे याची क्षण क्षणाची माहिती पोलिसांना व्हावी. व कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून या संपूर्ण कॅमेरांचे नियंत्रण कुही पोलीस ठाण्यात ठेवले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून शहर सुरक्षेसाठी लावलेले ३५ कॅमेरांपैकी केवळ ७ कॅमेरे सुरु असून मुख्य मार्गावरीलच कॅमेरे बंद असून बंद असलेले कॅमेरे शोभेची वास्तू ठरत आहे. तेव्हा नगरपंचायत प्रशासनाने बंद पडलेल्या कॅमेरांना पुन्हा सुरु करण्याची मागणी नागरिकांतर्फे केल्या जात आहे.

गत आठवड्यातच एका इसमाने मौदा येथील महिलेला उमरेड येथे दुचाकीने नेऊन देतो म्हणून कुही मार्गे आणून सोनपुरी शिवारात मंगळसूत्र चोरले होते. सदर इसम हा महिलेला कुही शहरातून घेऊन गेला होता. त्यात अज्ञात चोराचा शोध घेण्यासाठी हे कॅमेरे महत्वाचे ठरणार होते. मात्र कॅमेरे बंद असल्याने पोलिसांना फार मेहनत घ्यावी लागली. तर नुकतेच शुक्रवारी शहरातील लक्ष्मी मंगल कार्यालय नजीक एका दुचाकी दुरुस्त करण्याच्या दुकानातून भर दिवसा चोरट्यांनी एका ग्राहकाची दुचाकी पळवली आहे. मात्र कॅमेरेच बंद असल्याने चोरांचा शोध घेण्यास पोलिसांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे