रानडुक्कर आडवा आल्याने दुचाकी झाडावर आदळली
उपचाराअभावी चालकाचा मृत्यू
भंडारा : मित्राला त्याच्या गावी सोडून स्वगावाकडे परत येत असलेल्या तरुणाच्या दुचाकीसमोर अचानक रानडुक्कर समोर आल्याने दुचाकी अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. त्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. सदर अपघात सानगडी-सिरेगाव टोला मार्गावर घडला. सुरज सुनील मेश्राम (२९) रा. शिवनीबांध असे मृतकाचे नाव आहे.

शिवनीबांध येथील सुरज मेश्राम हा सकाळी ११ वाजता दरम्यान आपल्या मित्राला मोटारसायकलने मुंगली येथे सोडून गावी परत येत असताना सिरेगाव टोला-सानगडी रस्त्यावर सुरज याच्या मोटारसायकल समोर अचानक रानडुक्कर आल्याने मोटारसायकलस्वाराने करकचून ब्रेक लावले. त्यामुळे मोटारसायकल अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला आदळली. सायंकाळ होऊनही सुरज घरी परतला नसल्याने त्याच्या कुटुंबियांनी शोधण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता दरम्यान त्याचा शोध घेत असताना सिरेगाव टोला – सानगडी रस्त्यावर सुरज हा बेशुध्द अवस्थेत दिसून आला. त्याला उपचाराकरीता उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे नेण्यात आले. तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी साकोली पोलिसात मर्ग दाखल केला आहे.


