ऑन ड्युटी डॉक्टर दारूच्या नशेत धुंद ; नागरिकांनी गाठले कुही पोलीस स्टेशन

ऑन ड्युटी डॉक्टर दारूच्या नशेत धुंद 

नागरिकांनी गाठले कुही पोलीस स्टेशन

कुही :- कुही तालुक्यातील तितूर प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑन ड्युटी कार्यरत असलेला डॉक्टर मद्यधुंद असल्याने नागरिकांनी वरिष्ठांना माहिती देत कुही पोलीस ठाणे गाठत पोलिसांत तक्रार दिल्याची माहिती आहे.

बुधवारी तितूर येथे सायंकाळच्या सुमारास कानात किडा घुसल्याने तितूर येथील एक नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेला होता. तेव्हा तेथील कार्यरत परिचारिकेने उपचार केला मात्र तरीही किडा न निघाल्याने संबंधित रुग्णाने डॉक्टरांना बोलाविण्याची मागणी केली. तरीही डॉक्टर येत नसल्याने विचारपूस केले असता कार्यरत डॉक्टर दारूच्या नशेत धुंद असल्याने समजले. लागलीच संबंधित रुग्णाने याची माहिती गावातील नागरिकांना दिली. गावकऱ्यांनी याची माहिती तीतुरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शाम खोब्रागडे व कुहीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश चकोले यांना माहिती दिली. काही वेळातच दोन्ही अधिकारी हे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल होत नागरिकांसमवेत डॉक्टरची विचारपूस केली असता डॉक्टर दारू पिऊन असल्याचे समजून आले. ऑन ड्युटी डॉक्टर दारू पिऊन असल्याचे समजताच ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत वैद्यकीय अधिकारी यांचे समवेत कुही पोलीस स्टेशन गाठत मद्यधुंद डॉक्टर विरोधात तक्रार देऊन कुही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

* तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांनी पोलीस ठाणे गाठले सोबत संबंधित डॉक्टरही होता.पोलीस ठाण्यात काहीवेळ बसल्यानंतर अचानक डॉक्टर दिसून न आल्याने अधिकाऱ्यांसह पोलिसांची मोठी तारांबळ उडाली होती. त्यानंतर अर्ध्या तासाने डॉक्टर परतल्यावर पुढील प्रक्रिया पूर्ण केली.

* संबंधित डॉक्टर प्राथमिक आरोग्य केंद्रातील जबाबदार अधिकारी असूनही सेवेवर कार्यरत असताना मद्यधुंद अवस्थेत असल्याने कदाचित वैद्यकीय आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास जबाबदार कोण असतील असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.