कन्हान नदीत मासेमारीदरम्यान बुडून मच्छीमाराचा मृत्यू
कुही : तालुक्यातील राजोला येथील कन्हान नदीत मासेमारी करत असताना डोंगा पलटी झाल्याने एका मच्छीमाराचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृतकाचे नाव संतोष हरी उके (वय ४५ वर्षे, रा. राजोला) असे आहे.
दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी दुपारी अंदाजे २ ते ५ वाजेदरम्यान ते नेहमीप्रमाणे एकटेच डोंग्याने मासेमारीसाठी कन्हान नदीत गेले होते. मासेमारीदरम्यान त्यांचा तोल जाऊन डोंगा पलटी झाला. त्यांना पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व प्रशासनाने शोधकार्य सुरू केले. मंगळवारी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान त्यांचा मृतदेह नदीत आढळून आला.

घटनेची नोंद वेलतुर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून वेलतुर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. त्यांच्या मृत्यूबाबत कसलाही संशय व्यक्त करण्यात आलेला नाही. या घटनेमुळे राजोला परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. अधिक तपास वेलतुरचे ठाणेदार प्रशांत मिसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वेलतुर पोलीस करत आहेत.







