वाळू तस्करांचे धाबे दणाणले; महसूलमंत्र्यांचे विभागीय चौकशीचे आदेश

वाळू तस्करांचे धाबे दणाणले; महसूलमंत्र्यांचे विभागीय चौकशीचे आदेश

भंडारा : तुमसर तालुक्यातील वैनगंगा व बावनथडी नदीची वाळू उच्च गुणवत्तेची आहे. तिला मोठी मागणी असल्याने तस्करांनी नवीन शक्कल लढवून तंत्रज्ञानालाही आव्हान दिले आहे. वाळू वाहतुकी दरम्यान घाटापासून वाहतूक करणाऱ्या वाहनाला जिओ टॅगिंग लावणे गरजेचे आहे. ते दुचाकीला लावून ती महाराष्ट्राच्या सीमेत आणणे व त्यानंतर येथील ट्रक व टिप्परला हे जिओ टॅगिंग लावून नागपूर येथे वाळू नेली जात आहे. हा प्रकार मागील कित्येक महिन्यापासून सुरू आहे. राज्याच्या महसूल मंत्र्यांनी विभागीय चौकशीचे आदेश दिले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमा लागून आहेत. वैनगंगा व बावनथडी या दोन्ही नद्या दोन्ही राज्याच्या सीमेतून वाहतात. मध्यप्रदेशात वाळू घाटांचा लिलाव करण्यात आला आहे. परंतु राज्याच्या सीमेतील घाटांच्या लिलाव न करता शासकीय वाळू डेपो सुरू करण्यात आले. तसेच तालुक्यातील इतर अनधिकृत रेती बावनथडी व वैनगंगा नदीपात्रातून उपसा सुरू आहे. वाळू वाहतुकीकरिता रॉयल्टी अनिवार्य आहे. मध्यप्रदेशातील घाटावर जाण्याकरिता ट्रक व टिप्परला मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे तस्करांनी तुमसर तालुक्यातील वाळू ट्रक व टिप्पर मध्ये भरणे सुरू केले.

वाळू व टिप्पर मध्यप्रदेशात न जाता ते महाराष्ट्राच्या सीमेतच थांबायचे. मध्यप्रदेशातील घाटातून दुचाकीला जिओ टॅगिंग लावून ती महाराष्ट्राच्या सीमेत आणण्यात येत आहे. त्यानंतर दुचाकीची जिओ टॅगिंग रेती वाहतूक करणाऱ्या ट्रक व टिप्परला लावण्याच्या गोरखधंदा येथे केला जात होता. महसूलमंत्र्यांनी या सर्व प्रकाराची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले. शासनाच्या महसूल विभागाचे अधिकारी यांचे आदेश येथे धडकल्याने तुमसर तहसील कार्यालयात कागदपत्रांची जुळवाजुळव करताना अधिकारी व्यस्त आहेत. या खेळात आता कुणाचा बळी जाणार याची चर्चा सुरू आहे.