जेलमधून बाहेर येताच काढला मित्राचा काटा ; पोलिसांना टीप दिल्याचा संशयातून दोघात झाला होता वाद
नागपूर : यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिलगाव परिसरात रात्री जुन्या वैमनस्यातून एका तरुणाची त्याच्याच मित्राकडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मृताचे नाव फारुख उर्फ सोनू अमीन शेख (वय अंदाजे ३०) असून आरोपीचे नाव सुनील सारंगपुरे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फारुख आणि सुनील पूर्वी चांगले मित्र होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी फारुखला चोरीच्या गुन्ह्यात अटक झाली होती. ही कारवाई लकडगंज पोलिसांनी केली होती. ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवणारा त्याचा मित्र सुनीलच होता असा संशय फारुकला होता. ज्यामुळे त्याला तुरुंगात जावे लागले होते. सुमारे महिनाभरापूर्वी फारुख तुरुंगामधून बाहेर आला होता. त्यानंतर दोघांमध्ये एकदा वाद झाला होता. रात्री फारुख भिलगाव परिसरात एका मित्राशी बोलत असताना अचानक सुनील तिथे आला. दोघांमध्ये पुन्हा एकदा वादावादी झाली. वाद विकोपाला गेल्यानंतर सुनीलने त्याच्याकडे असलेल्या धारदार चाकूने फारुखवर वार केले. या हल्ल्यात फारुख गंभीर जखमी झाला. सुनीलने घटनास्थळावरून पलायन केले.

परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि जखमी फारुखला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू केली आहे.

