मुसळधार पावसाने शेतपिकांचे कंबरडे मोडले ; दुपारपर्यंत वाहतूक ठप्प
कुही :- रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने कुही तालुका सर्वदूर जलमय झाला. शनिवारी सकाळी ७ वाजता पर्यंत तालुक्यातील बहुतेक नदी-नाल्यांना पूर येऊन पुलांवर पाणी आल्याने दुपारपर्यंत वाहतूक खोळंबली होती. मुसळधार पावसाने शेतपीके खरडून निघाले असून नदीनाल्याकाठी अनेकांची शेतपीके पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे .
हवामान विभागाने २० जुलै शनिवार ला ऑरेंज अलर्ट जारी करत नागरिकांना सतर्कतेचा ईशारा दिला होता. शुक्रवारी रात्रीपासूनच तालुक्यात सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावत सततच्या मुसळधार पावसाने कुही तालुक्यातील बहुतांशी नाल्यांना पूर येऊन पुलावरून पाणी गेल्याने अनेक गावांचा संपर्क दुपारपर्यंत तुटला होता. आंभोरा ते पाचगाव दरम्यान चीपडी व माळनी येथील नाल्यांच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने मुख्य वाहतूक दुपारपर्यंत बंद होती. तर चापेगडी पुल, आपतूर पूल, तारणा पूल , व नागनदी (अंबाडी) आदी मुख्य मार्गावरील पुलांवर पुराचे पाणी वाहत असल्याने दुपारपर्यंत तालुक्यातील दळणवळण पूर्णपणे बंद होती. कुही-वडोदा मार्गावरील नागनदी ओसंडून वाहत असून सकाळपासून सायंकाळ पर्यंत हा मार्ग बंद असून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त होता.
गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी जोराच्या पाण्याची वाट पाहत होते. शुक्रवारी रात्रीपासून सुरु झालेला पाऊस गुरुवारी दुपारी बारा पर्यंत मुसळधार बरसला. यामुळे सोयाबीन,कपास व धानपिक आदी शेतपीके खरडून निघाली आहेत. तर नदी नाल्यांच्या काठावरील शेतात पाणी साचून राहिल्याने शेतपिकांची मोठी नासाडी झाली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ग्रामीण भागात घरांत पाणी शिरल्याने अनेकांचे जीवनावश्यक साहित्य पाण्यात गेले असून गावखेड्यात मातीच्या घरांची मोठीपडझड झाली आहे.
- कमी उंचीच्या पुलांमुळे गावखेड्यात उद्भवते आपत्कालीन स्थिती
तालुक्यातील बहुतांशी रस्त्यांवरील नाल्यांवर अजूनही जुनेच पूल आहेत. आजघडीला रस्त्यांची उंची जास्त व पुलांची उंची कमी अशी परिस्थिती असल्याने थोड्याशाही पावसाने या नाल्यांना पाणी आले कि पुलावरून पाणी वाहते व परिणामी वाहतूक ठप्प होते. शुक्रवारी रात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसाने नदी नाले दुथडी भरून वाहत होते. त्यामुळे अनेक कमी उंचीचे पूल पाण्याखाली येऊन त्यावरील वाहतूक बंद पडल्याने गावांचा संपर्क तुटून गावातून बाहेरच पडता येत नसल्याने आणीबाणीच्या वा आरोग्याच्या कामासाठी बाहेर पडता येत नाही. हि परिस्थिती तालुक्यातील मोहाडी,भोवरदेव सह अनेक गावांत असून अनेकदा मागणी करूनही पुलांचे काम होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
- पर्जन्य कुही तालुका
कुही सर्कल : ७८.४
राजोला सर्कल : ८६.४
पाचखेडी सर्कल : ६९.०
मांढळ सर्कल : १००.५
तितूर सर्कल : ७६.६
वेलतुर सर्कल : ८१.२
आजचा एकूण पाऊस : ४९२.१
आजचा सरासरी पाऊस: ८२.०१६