कुही पोलिसांची अवैध धंद्यांवर धडाकेबाज कारवाई : मोहफुलाचा सडवा नष्ट, गोवंश सुटले, लाखोंचा मुद्देमाल जप्त…

कुही पोलिसांची अवैध धंद्यांवर धडाकेबाज कारवाई :  मोहफुलाचा सडवा नष्ट, गोवंश सुटले, लाखोंचा मुद्देमाल जप्त…

स्वप्नील खानोरकर

कुही– नागपूर जिल्ह्यातील कुही पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन अवैध धंद्यांवर ठोस कारवाई करण्यात आली असून दोन्ही प्रकरणांमध्ये मिळून सुमारे ७.८७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मोहफुलाच्या सळव्यावर छापा  ५,२०० लिटर सडवा नष्ट

आज दि. २० जुलै रोजी संध्याकाळी ६.३४ वाजता, कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चांपा गावातील पारधी बेड्यावर मोहफुलाचा सडवा अवैधपणे बाळगून त्याचा वापर दारू बनविण्यासाठी करण्यात येत असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांच्या नेतृत्वाखाली पाच पथकांनी एकाचवेळी छापा टाकला. या कारवाई दरम्यान घटनास्थळी ५२ ड्राममध्ये प्रत्येकी १०० लिटर प्रमाणे एकूण ५,२०० लिटर मोहफुलाचा सडवा सापडला. याची एकूण किंमत सुमारे १,८२,००० रुपये आहे. याशिवाय ५२ रिकामे ड्रम (किंमत १०,४०० रुपये) मिळून एकूण १,९२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर सडवा पंचासमक्ष जागेवरच नष्ट करण्यात आला. या प्रकरणी पाच वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून, आरोपींचा शोध सुरू आहे.

गोवंश वाहतुकीवर छापा – ११ जनावरे सुटले, आरोपी पसार

दुसऱ्या कारवाईत, शनिवार १९ जुलै रोजी, पोलीस पेट्रोलिंग दरम्यान उमरेडहून एक बोलेरो पिकअप (एमएच-40-बीएल-8554) वाहन गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. चांपा टोल नाक्यावर वाहन दिसताच पोलिसांनी पाठलाग केला. आरोपी वाहन थांबवून पसार झाला, मात्र वाहनातून ११ गोवंश जनावरे निर्दयतेने कोंबलेली आढळून आली.सदर जनावरांची किंमत ९५,००० रुपये, तर बोलेरो वाहनाची किंमत ५,००,००० रुपये असून, एकूण ५,९५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गोवंश जनावरे लगेचच गौरक्षण संस्थेत हलवण्यात आले. या प्रकरणी प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा १९६० आणि महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या दोन्ही कारवाया मा. पोलीस अधीक्षक हर्ष पोदार, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल मस्के, उपविभागीय पोलीस अधिकारी वृष्टी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या. पो.नि. प्रशांत काळे, हरिचंद्र इंगोले, स्वप्नील गोपाले, धीरज मसराम, अजय पंचभाई यांच्यासह कुही पोलीस ठाण्याचे सुमारे २० कर्मचारी या मोहिमेत सहभागी होते.या प्रभावी कारवायांनी कुही परिसरात अवैध धंद्यांवर मोठा आघात झाला असून, पोलिसांचे पुढील पावलेही कठोर असतील, असा इशारा देण्यात आला आहे.