शेतशिवारात वीज पडून बैलाचा मृत्यू
शेतकरी थोडक्यात बचावला
समुद्रपूर : तालुक्यातील गिरड शिवारातील शेतात बैलाचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी शेतकरी सुदैवाने थोडक्यात बचावला. १९ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. गिरड परिसरात विजेच्या गडगडाटासह पावसाला सुरूवात झाली. यावेळी गिरड येथील शेतकरी जिवन मारोती कापसे यांचे वडील मारोती कापसे शेतात बैल चारत असताना अचानक वीज पडल्याने एका बैलाचा मृत्यू झाला.

यावेळी बाजूला असलेले शेतकरी मारोती कापसे व एक बैल सुदैवाने थोडक्यात बचावला. ऐन शेतीच्या हंगामात ५० हजार रुपयांचे बैल दगावल्याने शेतकर्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार यांनी संबंधित मंडल अधिकारी व तलाठ्याला पंचनामा करण्याचे आदेश दिले आहे. झालेल्या नुकसानाची शेतकर्याला तातडीने भरपाई देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.


