परसोडी (रीठी) शिवारात वाघाचा कहर ; गोऱ्ह्याची शिकार, कुहीपासून अवघ्या ४ किमीवर भीतीचे सावट

परसोडी (रीठी) शिवारात वाघाचा कहर 

गोऱ्ह्याची शिकार, कुहीपासून अवघ्या ४ किमीवर भीतीचे सावट

 

कुही : तालुक्यातील परसोडी (रीठी) शिवारात बुधवारी सकाळी वाघाच्या हल्ल्यात एका गोऱ्ह्याचा बळी गेल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, ही घटना कुही शहरापासून अवघ्या ४ किलोमीटर अंतरावर घडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी माणिक खराबे,रा.सिल्ली  मंगळवारी (दि. १८ नोव्हेंबर) सायंकाळी शेतातील काम आटोपून सिल्ली येथील घरी परतले होते. बुधवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे शेतात गेल्यानंतर बांधलेल्या जनावरांपैकी एक गोऱ्हा जागी नसल्याचे आढळले.

गोठ्याभोवती पाहणी केली असता जमिनीवर रक्ताचे डाग दिसून आले. तसेच एखाद्या प्राण्याला ओढत नेल्याच्या खुणाही स्पष्टपणे उमटल्या होत्या. पुढे शोध घेतला असता शेता लगत असलेल्या नाल्याजवळ गोऱ्ह्या शिकार झालेल्या अवस्थेत दिसला. त्याची जंगली प्राण्याने शिकार केल्याचे स्पष्ट दिसत होते.

 

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पाहणीदरम्यान त्या ठिकाणी वाघाचे पंजांचे ठसे आढळून आल्याने ही शिकार वाघाने केल्याची खात्री पटली. वनविभागाने पंचनामा करून परिसरात कॅमेरे बसवले आहेत. तसेच वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे. वनविभागाने परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून रात्रीच्या वेळी जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधण्याचे, तसेच शक्यतो एकटे शेतात न जाण्याचे निर्देश दिले आहेत. कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित वनविभागाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

 

या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी वनविभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.