नागपूर : वाघाची शिकार करणाऱ्या सहा आरोपींना अटक ; २४ मार्च पर्यंत वनकोठडी
नागपूर : खापा वनपरिक्षेत्राअंतर्गत नागलवाडी वनक्षेत्राअंतर्गत कोरमेटा नियतक्षेत्रातील मौजा सिरोंजी हद्दीत भनगाळा नाल्यामध्ये १४ मार्चला वाघ मृतावस्थेत आढळून आला. वाघाचे पायाचे चार पंजे, मिश्या व चार सुळे दात शिकाऱ्यानी काढून नेल्याचे आढळून आले. घटनास्थळी पाहणी केली असता ११ के.व्ही. विदयुत लाईनवर आकोडा टाकुन, विदयुत प्रवाहाव्दारे आरोपींनी वाघाची शिकार केली असल्याचे सकृत दर्शनी दिसून आल्याने अज्ञात आरोपी विरूध्द वनगुन्हा नोंदविण्यात आलेला होता.
या प्रकरणी आरोपीचा शोध घेण्याकरिता नागलवाडी वर्तुळ मधील सोनपुर, सिरोंजी, सुरेवाणी, टेकाडी, कोरमेटा, बिचवा इत्यांदी गावात वनविभागाने गस्त वाढवली होती. त्यामुळे प्रकरणातील आरोपीचा शोध घेता आला. या प्रकरणात महाराष्ट्रातील स्थानिक चार आरोपी व मध्यप्रदेश मधील तोरणी ता. बिछया जि. छिदवाडा या गावातील दोन आरोपीचा सहभाग दिसून आल्याने आरोपीना अटक करण्यात आली. आरोपींनी वन्यप्राणी शिकार केल्याची कबुली दिली असुन शिकार करण्याचे साहित्य अवजारे इत्यांदी आरोपीकडून हस्तगत करण्यात आले.

याप्रकरणात सहाही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, प्रथमश्रेणी न्यायालय सावनेर यांनी आरोपीना २४ मार्चपर्यंत वनकोठडी मंजुर केली आहे. तथापी पुढील तपास चालू असून प्रकरणातील इतर फरार आरोपीचा शोध घेणे सुरू आहे.


