राजोला येथे अवैध दारू विक्रीवर वेलतुर पोलिसांची धडक कारवाई ; दोघांना अटक

राजोला येथे अवैध दारू विक्रीवर वेलतुर पोलिसांची धडक कारवाई; दोघांना अटक

स्वप्नील खानोरकर

कुही– वेलतुर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राजोला गावात अवैधरित्या देशी दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वेलतुर पोलिसांनी आज सकाळच्या सुमारास दोन ठिकाणी छापे टाकून कारवाई केली. या कारवाईत दोन आरोपींना अटक करून एकूण २७१० रुपयांचा देशी दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पहिल्या कारवाईत आरोपी रविंद्र बळीराम लाडे (वय ५६, रा. राजोला) याच्या घरी झडती घेतली असता त्याच्या हॉलमध्ये शिलाई मशीनजवळ कापडी पिशवीत कोकण प्रीमियम देशी दारू ९० मि.ली.च्या ९ बाटल्या (₹४०५) व भिंगरी संत्रा देशी दारू ९० मि.ली.च्या २३ बाटल्या (₹१०३५) असा एकूण १४४० रुपयांचा मुद्देमाल सापडला.

दुसऱ्या कारवाईत आरोपी राजकुमार गरीबा बीरबल (वय ४७, रा. राजोला) याच्या घरी छापा टाकण्यात आला. त्याच्या घराच्या जिन्याखालील प्लास्टिक स्टुलमध्ये कोकण प्रीमियम देशी दारू १८० मि.ली.च्या ४ बाटल्या (₹२८०), कोकण प्रीमियम ९० मि.ली.च्या १६ बाटल्या (₹७२०) आणि भिंगरी संत्रा ९० मि.ली.च्या ६ बाटल्या (₹२७०) असा एकूण १२७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या दोन्ही कारवायांमध्ये एकूण २७१० रुपयांचा अवैध देशी दारूचा साठा हस्तगत करण्यात आला असून दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले .ही कारवाई वेलतुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रशांत मिसाळे आणि पोलीस उपनिरीक्षक करंगामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई अमोल झाडे व अतुल बांते यांच्या पथकांनी केली.