शिक्षणासाठी नागपुरात आलेल्या १० वर्षीय मुलाला मोठी आई रागावल्याने घरून पलायन ; लहान भावासह मुंबईला निघाला
नागपूर : मोठी आई रागावल्याने 10 वर्षीय मुलाने नऊ वर्षाच्या चुलत भावासह नागपुरातून पलायन केले. दोघेही विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईला जायला निघाले. पोलिसांनी वेळीच शोध घेत मलकापूर येथे दोघांना ताब्यात घेतले. मुले सुखरुप आढळल्याने नातेवाइकांनी सुटकेचा निश्वास सोडला. ही घटना वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
दीड महिन्यांपूर्वी दहा वर्षीय चेतन (नाव बदललेले) हा मोठ्या आईकडे (मावशी) आला. त्याला नागपुरात चांगले शिक्षण मिळावे यासाठी आईने त्याला नागपुरातच ठेवले. आईपासून दुरावल्याने तो दु:खी झाला. त्याला नागपुरात करमत नव्हते. त्याला शाळेतही दाखल केले. दरम्यान, मोठी आई त्याला रागवायची. त्यामुळे त्याने नागपुरातून पलायनचा निर्णय घेतला. शुक्रवारी चेतन व त्याचा नऊ वर्षीय चुलत भाऊ घरासमोर खेळत होते. घरी कोणी नसल्याचे बघून चेतनने भावासह तेथून पळ काढला. ते आधी मोठा ताजबाग येथे गेले. तेथे थांबले. एकाचवेळी दोन मुले बेपत्ता झाल्याने नातेवाइकांनी शोध घेतला. वाठोडा पोलिसांत तक्रार दिली. दरम्यान ताजबाग परिसरात राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी दोघेही रेल्वेस्थानकावर पोहोचले. विदर्भ एक्स्प्रेसमध्ये बसून दोघेही मुंबईला निघाले.

वाठोडा व गुन्हेशाखा पोलिसांनी सीसीटीव्हीची पाहणी केली असता दोघे रेल्वेस्थानकावर गेल्याचे आढळले. पोलिसांना दोघेही विदर्भ एक्स्प्रेसमध्ये बसताना दिसले. पोलिसांनी गाडीची माहिती काढली. गाडी मलकापूर रेल्वे स्थानकावर थांबणार असल्याचे पोलिसांना कळाले. पोलिसांनी मलकापूर स्थानकावरील लोहमार्ग पोलिसांना माहिती दिली. लोहमार्ग पोलिसांनी गाडीत शोध घेतला असता दोघेही आढळले. पोलिसांनी नागपूर पोलिसांना कळविले व दोघांना नागपुरात आणून नातेवाइकांच्या स्वाधीन केले.
