धावत्या मोटारसायकल समोर अचानक चितळ आडवा ; अपघातात सीआरपीएफ जवानाचा बळी  

धावत्या मोटारसायकल समोर अचानक चितळ आडवा 

अपघातात सीआरपीएफ जवानाचा बळी  

पवनी : कारधा- पवनी मार्गावर दवडीपार(बा.) जवळ दि. २० ऑगस्ट रोजी सायं. ६ वाजता दरम्यान धावत्या मोटारसायकल समोर चितळ आडवा आल्याने झालेल्या अपघातात सीआरपीएफ जवानाचा मृत्यू झाला. दयाल रामचंद्र क्षीरसागर(४७) रा. शहापूर असे मृतकाचे नाव आहे.

भंडारा तालुक्यातील शहापूर येथील दयाल क्षीरसागर हे गडचिरोली येथे सीआरपीएफ मध्ये कार्यरत होते. सुट्टीवर शहापूर येथे मो.सा.क्र. एमएच ३६ बी ५९८५ या गाडीने पवनी- भंडारा मार्गे जात असतांना दवडीपार(बा.) जवळ धावत्या मोटारसायकल समोर अचानक चितळ आडवा आल्याने अपघात घडला. त्यात दुचाकीस्वार जवान रस्त्यावर पडून जखमी झाला. अपघाताची माहिती पोलीस व वनविभागाला मिळताच घटनास्थळी धाव घेत जखमीला जिल्हा सामान्य रूग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने जखमीला नागपूरला हलवित असतांना वाटेतच जखमीची प्राणज्योत मालवली. त्याच्या अपघाती मृत्यूने शहापूरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास कारधा पोलीस करीत आहे.