अवैध गावठी दारू काढणाऱ्यावर पोलिसांची कारवाई
1800 लिटर सडवा ध्वस्त
कुही:- तालुक्यातील मौजा-तितुर येथे अवैधरित्या गावठी दारू काढण्यासाठी दारूचा सडवा करत असलेल्या ठिकाणावर कुही पोलिसांनी धडक कारवाई करत 9 ड्रम मधील चक्क 1800 लिटर मोहफुलाचा सडवा ध्वस्त केला आहे.
कुही पोलिसांना विश्वसनीय मुखबिराद्वारे मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तालुक्यातील मौजा तितुर येथील नाग नदीच्या काठावर अवैध रित्या प्लास्टिक ड्रम मध्ये मोहफुलाचा सडवा करून दारू काढण्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाली. लागलीच कुहीचे ठाणेदार भानुदास पिदूरकर यांच्या उपस्थितीत कुही पोलिसांनी 2 पंचासमक्ष तितुर येथील नागनदीच्या पुलापासून 500 मिटर अंतरावरील एका ठिकाणी जाऊन पाहणी केली असता तेथे 9 प्लास्टिक ड्रम झाकून ठेवल्या स्वरूपात दिसून आले. पोलिसांनी ड्रम उघडून पाहणी केली असता त्यात मोहफुलाचा सडवा साठवून ठेवल्याचे दिसून आले.पोलिसांनी अवैध गावठी दारू विक्रीसाठी सडवा साठवून दारू काढणाऱ्या आरोपी आकाश रामराव धनगर (वय-26) रा.तितुर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना दारू तयार करण्यासाठी साठवून ठेवलेला मोहफुलाचा सडवा 9 ड्रम मध्ये प्रत्येकी २०० लिटर प्रमाणे १८०० लिटर मोहा सडवा रसायन ज्याची किंमत ३५ रुपये लिटर प्रमाणे ६३००० रुपये व 9 नग प्लास्टिक ड्रम प्रत्येकी ५०० प्रमाणे ४५०० रुपये असा एकूण ६७५०० रुपयांचा माल मिळून आला. पोलिसांनी मोह्फुलाचा सडवा घटनास्थळीच ध्वस्त केला. हि कारवाई कुहीचे ठाणेदार भानुदास पिदुरकर, चांगदेव कुथे, आशिष खंडाईत, उमेश ठवकर, रवींद्र मारबते यांनी केली आहे.