बिबट्याने केली गाईची शिकार
एन मानवी वस्तीजवळ बिबट्याच्या वास्तव्याने परिसरात भीतीचे वातावरण
कुही:- कुही शहरानजीक भोजापूर मानवी वस्तीजवळ शेतात बांधलेल्या गाईवर बिबट्याने हल्ला चढवून शिकार करत गाईला ठार केले आहे. बिबट्याच्या वास्तव्याने भोजापूर सह कुही शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकरी लक्ष्मण झुरमुरे ,रा. कुही याचे भोजापूर शिवारात शेत असून ते नियमित शेतात गुरे चरायला सोडून रात्री शेतातच बांधून ठेवत. मंगळवारी सायंकाळी ते गुरे शेतात बांधून घरी परतले. व बुधवारी परत गुरांना चारा टाकायला गेले असता. त्यांना गाय शिकार झाल्याचे दिसून आले. लागलीच याची माहिती वन विभागाला देण्यात आली. मात्र शिकार कोणत्या प्राण्याने केली हे कळून आले नव्हते. वन विभागाने पंचनामा करून शिकार झाल्या ठिकाणी शिकार करणारा प्राणी येऊन म्हणून कॅमेरे लावले होते. गुरुवारी सकाळी कॅमेरे तपासले असता गाईची शिकार बिबट्याने केल्याचे दिसून आले. विशेष ज्या शेतात बिबट्याने शिकार केली तेथून भोजापूर मानवी वस्ती केवळ 50 मीटर अंतरावर असून कुही शहर केवळ 1 किलोमीटर अंतरावर आहे. तर या येथून नजीकच रेल्वे स्टेशनचे काम सुरु असून कुही ते आजनी व टाकळी मार्गावर ये-जा करणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ असते. त्यात पहिल्यांदा या भागात बिबट्या आढळून आला असून बिबट्याच्या वावरामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गाय मालक लक्ष्मण झुरमुरे यांचे अंदाजे ३५ हजारांचे नुकसान झाले असून तत्काळ नुकसान भरपाई देण्याच्या मागणी दिलीप लुटे, निखील खराबे, भास्कर खराबे, सतीश डोये,राहुल भोयर, यश मस्के, आयुष झुरमुरे, गौरव ढबाले आदी नागरिकांनी केली आहे.