“तालुक्यात जंगल आहे की जंगलातच तालुका?” कुही तालुक्यात वाघाचे थैमान; शेतकरी-पशुपालक भयभीत

तालुक्यात जंगल आहे की जंगलातच तालुका?”

कुही तालुक्यात वाघाचे थैमानशेतकरी-पशुपालक भयभीत

“तालुक्यात जंगल आहे की जंगलातच तालुका?” असा प्रश्न उपस्थित करत कुही तालुक्यात वाघाच्या वाढत्या वावराने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावोगावी व शिवारात वाघाचे दर्शन होत असल्याने शेतीकामे खोळंबली असून शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.

निखील खराबे

कुही : कुही तालुक्यात गेल्या महिनाभरापासून वाघाच्या वाढत्या वावराने संपूर्ण तालुक्यावर भीतीचे सावट पसरले आहे. चौफेर वाघाचे दर्शन होत असल्याने शेतकरी, पशुपालक तसेच शेतमजूर प्रचंड त्रस्त झाले आहेत. वाघाच्या भीतीने शेतमजूर कामावर येण्यास नकार देत असल्याने शेतीची कामे ठप्प झाली असून, अनेक शिवारात मजुरांचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे.

कुजबा, भोरदेव, पोहरा, टाकळी, खेतापूर, परसोडी (रीठी), मोहदरा, सोनपुरी, कुचाडी, सावंगी, ठाणा, चिखली, राजोली आदी गाव व शेतशिवारात वाघाने पाळीव प्राण्यांवर हल्ले केल्याच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. या हल्ल्यांत गाई, बैल, म्हशी तसेच शेळ्या ठार व जखमी झाल्याने पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

काही ठिकाणी रात्रीच्या सुमारास तर काही ठिकाणी चक्क दिवसाढवळ्या हल्ले झाल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. अनेक शेतकरी जनावरांना शेतात नेण्यास धजावत नसल्याचे वास्तव सध्या तालुक्यात पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे याच महिन्यात वेळगाव व दहेगाव शिवारात थेट गावातच वाघाचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली होती. जंगलालगतच नव्हे तर मानवी वस्तीपर्यंत वाघ पोहोचत असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यामुळे “कुही तालुक्यात जंगल आहे की जंगलातच तालुका वसला आहे?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

वनविभागाकडून घटनास्थळी पाहणी व पंचनामे करण्यात येत असले तरी वाघांचा मुक्त संचार अद्याप रोखला गेलेला नाही. नैसर्गिक अधिवास आणि मानवी वस्ती यातील अंतर कमी होत चालल्याने मानव-वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे.

या घटनांमुळे नुकसानग्रस्त पशुपालकांना तातडीने भरपाई देण्यात यावी, तसेच वाघांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना तात्काळ राबवाव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा “जंगलात तालुका वसला आहे” ही म्हण आता वास्तव ठरेल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

मानवी जीविताला धोका वाढतोय

पहाटे शेतात जाणारे शेतकरी तसेच शाळेत ये-जा करणारी मुले भीतीच्या छायेत वावरत आहेत. “आजवर नशीब बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली, पण एखादा अपघात घडल्यानंतरच प्रशासन हालचाल करणार का?” असा थेट सवाल संतप्त नागरिक उपस्थित करीत आहेत.

भरपाई : उशीरअपुरी व कागदोपत्रीच

वाघांच्या हल्ल्यांत पाळीव प्राणी ठार किंवा जखमी झाल्यानंतर वनविभागाकडून पंचनामे करण्यात येत असले, तरी भरपाई मिळण्यास मोठा विलंब होत असल्याची तक्रार पशुपालकांकडून केली जात आहे. काही प्रकरणांत भरपाईची रक्कम बाजारभावाच्या तुलनेत अत्यल्प असून, काही नुकसानग्रस्तांना अजूनही भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या पशुपालकांवर अन्याय होत असल्याची भावना तीव्र झाली आहे.

ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठा फटका

वाघाच्या भीतीमुळे शेतमजूर कामावर येण्यास तयार नसल्याने शेतीची कामे ठप्प झाली आहेत. पेरणी, निंदणी, काढणी यांसारखी कामे खोळंबल्याने पीक धोक्यात आले असून उत्पादन घटण्याची भीती व्यक्त होत आहे. पशुपालनावर अवलंबून असलेल्या अनेक कुटुंबांचे उत्पन्न घटले असून, याचा थेट परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होत आहे. “शेती आणि पशुपालन दोन्ही संकटात सापडल्याने जगायचे कसे?” असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.

वाघांचे संरक्षण आवश्यक आहेच; मात्र शेतकरीमजूरपशुपालक आणि ग्रामीण नागरिकांचे जीव त्याहून स्वस्त आहेत का? केवळ पंचनामे आणि कागदी कार्यवाही करून प्रशासन मोकळे होणार का, की वाघांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जाणार, असा प्रश्न तालुक्यात  विचारला जात आहेत.